क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
लागोपाठ तिसरा विजय नोंदवून एफसी गोवाने 130व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत दमदार विजय नोंदविला. काल कोलकातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एफसी गोवाने जमशेदपूर एफसीचा 5-0 गोलानी पराभव केला.
एफसी गोवा संघाचा हा तिसरा विजय असून त्यांनी 9 गुणानी गटात अग्रस्थान मिळविले आहे. मध्यंतराला एफसी गोवा संघ तीन गोलानी आघाडीवर होता. त्यांच्या देवेंद्र मुरगावकरने 20व्या व 44व्या, मुहम्मद नेमीलने 46व्या आणि 81व्या तर प्रिन्सटन रिबेलोने 26व्या मिनिटाला गोल केले. एफसी गोव्याने या सामन्यात आपला तिसरा गोलरक्षक ऋतिक तिवारी याला तसेच ब्रँडन फर्नांडिसला संधी दिली. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार दोन गोल केलेल्या मुहम्मद नेमील याला प्राप्त झाला. एफसी गोवाने आपल्या गटात अव्वल स्थान म्ळिविले. त्यांचे 9, आर्मी ग्रीनचे 6, जमशेदपूर एफसीचे 6 तर सुदेवा दिल्ली एफसीचा गुणफलक कोराच राहिला.
मोहन बागान ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लढतीत गतवर्षीय विजेता आर्मी ग्रीन संघाने सुदेवा दिल्ली एफसी संघाला एकमेव गोलने पराभूत केले. सामन्यातील विजयी गोल 51व्या मिनिटाला दिपक सिंगने केला. दिपक सिंगने जमशेदपूर एफसीविरूद्धच्या सामन्यातही दोन गोल केले होते. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार दिपक सिंगला मिळाला. आज शनिवारी या स्पर्धेत दिल्ली एफसी आणि बेंगलोर एफसी संघात सामना होईल.