क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
130व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत बेंगलोर एफसी आणि दिल्ली एफसी संघानी उपान्त्यपूर्व बाद फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेचे आयोजन कोलकातात करण्यात येत आहे. स्पर्धेतील लीग सामने पूर्ण झाले असून उपान्त्यपूर्व बाद फेरीतील लढतींना आता 23 सप्टेंबरपासून सुरुवात होईल.
काल युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लीग सामन्यात बेंगलोर एफसीने आरंभीच्या दोन गोलांच्या पिछाडीनंतर भारतीय नौदलचा 5-3 गोलानी पराभव केला. सामन्याच्या 18व्या आणि 29व्या मिनिटाला जिजो आणि गोपालन यांनी गोल करून दोन गोलांची भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतर सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत बेंगलोर एफसीने पाच गोल केले आणि आघाडी तीन गोलानी वाढविली.
बेंगलोर एफसीसाठी हरमनप्रीत सिंगने दोन तर लियॉन आगुस्तिन, अजय चेत्री आणि हुईद्रोम थॉय सिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. भारतीय नौदलसाठी सामन्याच्या शेवटच्या क्षणाला विजय याने गोल केला.
कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या गटातील लीग लढतीत दिल्ली फुटबॉल क्लबने केरळ ब्लास्टर्स संघाला एकमेव गोलने पराभूत केले. दिल्ली एफसीसाठी सामन्यातील विजयी गोल लढतीच्या 53व्या मिनिटाला विलिस प्लाझाने केला. या गटात बेंगलोर एफसीचे 3 सामन्यांतून 7, दिल्ली एफसीचे 4 तर भारतीय नौदल व केरळ ब्लास्टर्स संघांचे प्रत्येकी 3 गुण झाले.
आता या स्पर्धेत कोलकाताच्या मोहमेडन स्पोर्टिंग, गतविजेता गोकुळम केरळ, आर्मी रेड, बेंगलोर युनायटेड, एफसी गोवा, दिल्ली एफसी, बेंगलोर एफसी आणि आर्मी ग्रीन संघानी उपान्त्यपूर्व बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. 23 रोजी मोहम्मेडन्स स्पोर्टिंग आणि गोकुळम केरळ, 24 रोजी आर्मी रेड विरुद्ध बेंगलोर युनायटेड आणि एफसी गोवा विरुद्ध दिल्ली एफसी तर 25 रोजी बेंगलोर एफसी विरुद्ध आर्मी ग्रीन संघात लढती होतील.