प्रतिनिधी/ फोंडा
कुत्र्याच्या मागावर असलेला बिबटय़ा चक्क घरात घुसला…आणि काही वेळ घरच्या लोकांनी एक थरार अनुभवला. ही घटना ऐकून भितीने अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. वरचवाडा-ढवळी येथील श्याम गावडे यांच्या घरात शुक्रवारी रात्री हा बिबटय़ा घुसला.
श्याम गावडे यांच्या घराच्या सभोवताली कुळागर व पाठिमागे डोंगर आहे. या डोंगरावरुन आपल्या भक्ष्याच्या शोधत हा बिबटय़ा शुक्रवारी रात्री 12.30 वा. सुमारास घराजवळ पोचला. श्याम यांच्या घरात पाळलेले दोन कुत्रे असून त्यापैकी एका छोटय़ा कुत्र्याच्या पिल्लाच्या मागे हा बिबटय़ा लागला. आपला जीवा वाचवण्यासाठी केकाटत हे पिल्लू घराच्या ओसरीतून बाजूच्या खोलीत शिरले. त्याच्या मागोमाग बिबटय़ाही खोलीत घुसला. सुदैवाने या खोलीत कुणी झोपले नव्हते. कुत्र्याच्या केकाटण्याच्या आवाजाने श्याम व घरातील इतर मंडळी खडबडून जागी झाली. श्याम यांनी खोलीकडे धाव घेतली तर समोर चक्क बिबटय़ा होता. त्याने कुत्र्यांच्या पिल्लावर झडप घालून त्याचा गळाही पकडला होता. घरातून अचानक झालेली हालचाल पाहून बिबटय़ाही सावध झाला व त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर निसटण्याच्या प्रयत्नात फ्रिजवर चढला. खिडकीला लोखंड गज असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. प्रसंगावधान राखून श्यामने समोर असलेल्या दुसऱया खोलीत धाव घेतली व दरवाजा लावून घेतला. आपला रस्ता मोकळा झाल्याचे पाहून बिबटय़ाही घरातून निसटला व कुळागरातून थेट डोंगराच्या दिशेने पसार झाला.
ज्या घरात हा बिबटय़ा घुसला तेथे श्याम, त्यांचा भाऊ प्रकाश व दत्ताराम यांच्यासह आठ लोक राहतात. घराच्या ओसरीच्या बाजूला असलेल्या एका खोलीच्या दरवाजाला घरातील पाळीव कुत्र्यांच्या सोयीसाठी रात्री कडी लावली जात नाही. तेथे फ्रिज व अन्य काही वस्तू ठेवलेल्या आहेत. नेमका याच खोलीत बिबटय़ा घुसला. या परिसरात बिबटय़ाचा अधूनमधून संचार असल्याचे प्रभाकर गावडे यांनी सांगितले. गेल्यावर्षी घरात पाळलेल्या डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याच्या पिल्लावरही बिबटय़ाने असाच हल्ला चढविला होता. त्यावेळी प्रकाश यांनी बिबटय़ाचा पाठलाग केल्याने काही अंतरावर अर्धमेल्या अवस्थेत या पिल्लाला सोडून बिबटय़ा पळाला होता. प्रकाश याच्या एका चुलतभावाला रात्री कुळागरातील पायवाटेने घरी येताना समोर बिबटय़ाचे दर्शन घडले होते. जानेवारी व थंडीच्या याच दिवसात बिबटय़ा या भागात फिरकत असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वीही घरात पाळलेल्या काही कुत्र्यांचा फडशाही पाडण्यात आला आहे. पण शुक्रवारी रात्री चक्क बिबटय़ा त्यांच्या घरात घुसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.