प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीत नगरसेवकांमध्ये टेंडर, टक्केवारीसाठी लागणारी कळवंड नवीन नाही. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सातारा विकास आघाडीत सध्या भ्रष्टाचारावरून सुरु असलेल्या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न न करता कळवंड सोडवण्याचे धाडस दाखवावे. नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन डांगोरा पिटून सातारा पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपणार नाही, असा टोला विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी लगावला.
सातारा विकास आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे आणि नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्यात भ्रष्टाचारावरून आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधायांनी भ्रष्टाचाराचे कुरन बनवले असून सत्ताधायांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही, हे सातारकरांना चांगलेच कळून चुकले आहे. नगराध्यक्ष सौ. कदम आणि लेवे यांनी भ्रष्टाचार उघड करून सत्ताधारी आघाडीचा बुरखा टराटरा फाडला आहे. पालिकेत सुरु असलेली कळवंड थांबत नसल्याने विषयांतर करून शेंडे त्यावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ज्या कास प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताय त्या कास धरण प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून सुरुवातीला 40 कोटी निधी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच आणला. पुढे काम रखडल्यानंतर वाढीव 57.91 कोटी निधी आमदारांनीच आणला आणि मग काम सुरु झाले, हे सातारकरच नव्हे तर जिह्यालाही माहिती आहे.
कोणत्याही कामाला दिल्लीतून निधी आला कि दिल्लीचे प्रतिनिधी आमचे नेते असल्याने त्यांनीच निधी आणला असा गवगवा केला जातो. ग्रेड सेपरेटरसाठी राज्य सरकारने 20 कोटी निधी दिला. आ. शिवेंद्रसिंहराजे हे आमदार आहेत. ते राज्याचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे हा निधी त्यांच्याच माध्यमातून आला आहे. नगर पालिकेला अधिकार असता तर ग्रेड सेपपरेटरचे शासनाने अधिकृत उदघाटन केले नसते याची जाण उपनगराध्यक्षांना आहे का? तुमचे पितळ उघडे पडले आहे त्यामुळे विकासाच्या गप्पा मारून सातारकरांना भुलवणे आतातरी बंद करा. दरवर्षी शहरात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळे काढणे, क्रेन आणि लाईटचा ठेका कोण घेत? पाणीपुरवठा योजनेचा वॉल मेंटेनन्स ठेका कोणाचा आहे? शहरातील पथदिवे, पोल शिफ्टिंग आणि मेंटेनन्स ठेका कोणाकडे आहे? वरदविनायक नावाने दरवर्षी इलेक्ट्रिक वस्तू खरेदीत किती भ्रष्टाचार केला जातो, याचा खुला करण्याची हिम्मत उपनगराध्यक्ष शेंडे यांनी दाखवावी.
नगराध्यक्षांसाठी असणारा निधी किती टक्केवारी घेऊन विकला जातो? त्या निधीतून किती आणि कोणती विकासकामे केली जातात याची माहिती एकदा सातारकरांसमोर उघड करण्याचे धाडस दाखवा. पालिकेतील भ्रष्ट आणि अंधाधुंद कारभार लपवण्यासाठी विकासकामांचा ढोल बडवू नका. तुमची आघाडी किती एकसंघ आहे, हे वारंवार जनतेला दिसत आहे. उद्या प्रसिद्धी पत्रक काढताना पालिकेत ज्या विषयावरून सत्ताधायांमध्ये ’हुतूतू’ सुरु आहे त्याचा खुलासा आधी करा आणि मग विषयांतर करण्यासाठी नेहमीची टेप वाजवून खुशाल सातारकरांचे मनोरंजन करा, असा उपरोधिक टोला मोने यांनी शेंडे यांना लगावला आहे.