परिसर केला सीलडाऊन : नागरिकांत भीतीचे वातावरण
वार्ताहर/ हिंडलगा
मण्णूरमधील कलमेश्वर गल्ली परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गावात खळबळ माजली आहे. रविवारी सकाळी आरोग्य खात्याकडून मिळालेला स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संबंधित व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाला पाठविण्यात आले असून, गल्लीचा काही भाग सीलडाऊन करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलात सेवा बजाविणाऱया एका कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर व्यक्तीचा आरोग्य चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, कोरोना संशयित रुग्ण म्हणून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी सकाळी याबाबत माहिती मिळताच पीडीओ एम. गंगाधर, तलाठी कापसे, देवस्की पंच कमिटी अध्यक्ष अशोक चौगुले, विनय कदम, अशा कार्यकर्त्या व पंचायत कर्मचाऱयांच्या उपस्थितीत संशयित रुग्णाच्या घराच्या परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. तसेच घरापासूनचा सुमारे 50 मीटरपर्यंतच्या परिसरात प्रवेश बंदी करून सीलडाऊन केला आहे. आतापर्यंत मण्णूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता पण, अग्निशमक दलातील एका कर्मचाऱयापासून गावातील व्यक्तीला बाधा झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यासाठी आशा कार्यकर्त्या, आरोग्य खाते व पंचायतीकडून जनजागृती केली जात आहे.