वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय वायुदलाने दक्षिण भारतातील वायुतळांची सुरक्षा वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. या दृष्टीकोनातून देशाचे पहिले सरसेनापती जनरल बिपिन रावत आणि वायुदलप्रमुख आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत तामिळनाडूच्या तंजावर वायुतळावर सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रनमध्ये सोमवारी समावेश करण्यात आला. स्वनातीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राने युक्त असलेल्या सुखोई लढाऊ विमानाची दक्षिण भारतातील तळावर तैनात केलेली ही पहिलीच स्क्वॉड्रन आहे. हिंदी महासागराची सुरक्षा नजरेसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वायुतळावरील सोहळय़ात डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी उपस्थित होते. कार्यक्रमात सुखोई-30 (220 टायगर शार्क) ला वॉटर सॅल्यूट देण्यात आले. एअर टू एअर रिफिलिंगची क्षमता असलेल्या सुखोईमुळे हिंदी महासागर क्षेत्राची देखरेख करण्यास मदत होणार आहे.
तिन्ही संरक्षण दले कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहेत. कुठल्याही स्थितीची भविष्यवाणी करणे अत्यंत अवघड असते. पण दिलेल्या कामासाठी आम्ही सदैव सज्ज असतो, असे उद्गार सरसेनापती बिपिन रावत यांनी काढले आहेत. तंजावर येथील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनमुळे नौदल आणि सैन्याला अत्यंत मजबूत मदत उपलब्ध करता येणार आहे. या ठिकाणाहून हिंदी महासागरावर प्रभुत्व निर्माण करता येणार असल्याचे उद्गार रावत यांनी काढले आहेत.
क्षेपणास्त्रांची तैनात
सुखोई-30 लढाऊ विमानांमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसविण्याचे काम देशातच पार पडले आहे. ब्राह्मोस एअरस्पेस, एचएएल आणि वायुदलाकडून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. तंजावरमध्ये सुखोई-30 तैनात करण्याचा निर्णय त्याच्या सामरिक स्थितीमुळे घेण्यात आल्याचे वायुदल प्रमुख भदौरिया यांनी म्हटले आहे.
द टायगर शार्क
सुखोई-30 हे लढाऊ विमान 2.5 टन वजनाचे स्वनातीत ब्राह्मोस क्रूज क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. याचे नवे नाव ‘द टायगर शार्क’ ठेवण्यात आले आहे. ‘टायगर शार्क’ चौथ्या पिढीच्या सुखोईची 12 वी स्क्वाड्रन असून त्याला दक्षिण भारतात तैनात करण्यात आले आहे. 11 विमानांना पश्चिम तसेच पूर्व आघाडीवर तैनात करण्यात आले आहे. जल-भूमी-नभातून डागता येणारे ब्राह्मोस हे जगातील पहिले क्षेपणास्त्र आहे.
‘सुखोई-30’मधील क्षमता
सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान बॉम्बवर्षावासह क्षेपणास्त्रही डागू शकते. लढाऊ विमानात ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसविण्यात आले आहे. एकवेळ इंधन भरल्यावर 8000 किलो वजनाच्या अस्त्रांसह हे विमान 5200 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. एका तासात हे विमान 2450 किलोमीटरचे अंतर गाठू शकते.