पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफचे प्रतिपादन
कराची / वृत्तसंस्था
माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडला सातत्याने सचिन तेंडुलकरच्या छत्रछायेखाली खेळावे लागले. यामुळे कदाचित त्याची प्रतिभा अपेक्षेइतकी फुलली असेल किंवा नसेल. मात्र, माझ्या मते तंत्रशुद्धतेच्या निकषावर तोच भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरतो, असे प्रतिपादन पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफने केले. द्रविडचे पंटफूट डिफेन्सचे तंत्र त्याला अन्य सर्व फलंदाजांपेक्षा वेगळे ठरवते, असा लतिफचा दावा आहे. ‘कॉट बिहाईंड’ या यूटय़ूबवरील कार्यक्रमात तो बोलत होता.
‘एखादा फलंदाज धावा मिळवून देणारे फटके कसे खेळतो, यापेक्षा तो बचाव भक्कम करणारे फटके कसे खेळतो, हे अधिक महत्वाचे असते. या निकषावर प्रंटफूटवर उत्तम खेळणाऱया फलंदाजाचे तंत्र अधिक भक्कम ठरते अन् म्हणूनच अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा राहुल द्रविडचे तंत्र मला अधिक भावते’, असे रशीद लतिफ स्पष्टीकरणार्थ म्हणाला.
द्रविडचा बचाव, उसळते चेंडू निष्प्रभ करण्याची त्याची हातोटी, पॅडसवरुन मारलेले शानदार फ्लिक आणि पॉईंटच्या दिशेने मारलेले सणसणीत स्क्वेअर कट, हे त्याचे फटक्यातील वैभव होते. सचिनची वादळी फलंदाजी आणि सेहवागचा झंझावात, यांच्यासमोर द्रविड म्हणजे डोक्यावर बर्फ असणारा संयमी, बचावातील भक्कम फलंदाज ठरला. सौरभ गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यापूर्वी तो आपली जबाबदारी चोख पार पाडायचा. तंत्रशुद्ध फलंदाजी व दडपणाखाली खेळण्याची हातोटी यात द्रविड सर्वोत्तम ठरतो, असे लतिफने पुढे नमूद केले.
भारताचे आघाडीचे फलंदाज ज्या-ज्यावेळी स्वस्तात बाद झाले, त्या-त्या वेळी द्रविडच संघाच्या मदतीला सर्वाधिक वेळा धावून आला, असे निरीक्षण त्याने पुढे नोंदवले. सचिन तेंडुलकर, सेहवाग व गांगुली यांच्या मोठय़ा भागीदारीवर नजर टाकली तर त्यात त्यांचा भागीदार बहुतांशी वेळा द्रविडच असायचा, असेही त्याने नमूद केले. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आणि कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर धावा जमवण्याची त्याची क्षमता निर्विवाद होती, असे लतिफ पुढे म्हणाला. पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूने आपल्या कारकिर्दीत 37 कसोटी व 166 वनडे सामने खेळले आहेत.
बॉक्स
राहुल द्रविडच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप
स्पर्धा / सामने / धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके / अर्धशतके
कसोटी / 164 / 13288 / 270 / 52.3 / 36 / 63
वनडे / 344 / 10889 / 153 / 39.2 / 12 / 83
टी-20 / 1 / 31 / 31 / 31.0 / 0 / 0 आयपीएल / 89 / 2174 / 75ना. / 28.2 / 0 / 11