जीएसटी मंडळाच्या बैठकीत निर्णय, 2022 मध्ये संपणार होती मुदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मंडळाने कार्ससारख्या ऐषोरामी वस्तू आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील करावरील अधिभाराची कालमर्यादा वाढविताना 2022 नंतरही तो लागू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात महसुलातील तूट भरून काढण्यासाठी देण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यास राज्यांना मदत करण्याच्या योजनेंतर्गत अधिभाराची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे.
राज्याच्या अर्थमंत्र्यांसमवेत केलेल्या ‘व्हर्च्युअल’ बैठकीनंतर सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘जीएसटी कौन्सिल’ने अधिभार पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी वाढविण्यास मान्यता दिली आहे. जुलै, 2017 मध्ये जेव्हा जीएसटी लागू करण्यात आला तेव्हा जीएसटीच्या पहिल्या पाच वर्षांत करांच्या अखेरच्या उत्पन्नाच्या तुलनेत 14 टक्के वाढीव महसुलाचे आश्वासन राज्यांना देण्यात आले होते. ऐषोरामी आणि अन्य काही वस्तूंवर अधिभार आकारून हे केले जाणार होते. परंतु गेल्या आर्थिक वर्षापासून अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे कर संकलन कमी झाले आहे.
2022 मध्ये संपणार होती मुदत
कार्स आणि इतर ऐषोरामी वस्तूंवर तसेच तंबाखूजन्य पदार्थांवर सर्वाधिक जीएसटी दर म्हणजे 28 टक्के दरावर 12 टक्के ते 200 टक्क्मयांपर्यंतचा अधिभार असून जून, 2022 मध्ये त्याची मुदत संपुष्टात येणार होती. ती आता वाढविण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यांचे अर्थमंत्री यांचा समावेश असलेल्या जीएसटी मंडळाची पुढील बैठक 12 रोजी होणार असून त्यात या विषयाचा तपशील ठरणार असल्याचे केंदीय अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट
या आर्थिक वर्षातील ऑगस्टपर्यंतच्या पाच महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या कर उत्पन्नात मागील वर्षांच्या तुलनेत अंदाजे 40 टक्के घट झाली आहे. मार्च, 2021 मध्ये संपणाऱया चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला सुमारे 10 टक्क्मयांची घसरण पाहावी लागेल, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. सरकारचा सुरुवातीचा अंदाजे हा 6 टक्के वाढीचा होता. कर उत्पन्नात घट आल्याने केंद्र सरकारने यापूर्वीच चालू आर्थिक वर्षात बाजारातून 1.1 लाख कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घ्यावे, कारण अधिभारातून येणारा महसूल राज्यांची भरपाई करण्यास पुरेसा ठरणार नाही, असे राज्य सरकारांना स्पष्ट केलेले आहे.