कराडातील घटनेत एकास अटक, टिप देण्याच्या कारणावरून प्रकार
प्रतिनिधी / कराड
तडीपार असल्याची टीप पोलिसांना देतोस का? अशी विचारणा करत युवकास तडीपार गुन्हेगाराने चाकू हल्ला केल्याची घटना चांभार गल्ली गुरूवारपेठ येथे बुधवारी रात्री घडली. चाकू हल्ल्यात यश ऊर्फ निखील गणेश कारंडे (वय 18, रा. गुरूवार पेठ, कराड) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांत तडीपार असलेल्या संशयितासह त्याच्या साथीदारावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित रमेश कारंडे (वय 24 रा. चांभार गल्ली, कराड), अतिष लादे (रा. लादे गल्ली, बुधवार पेठ, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी यश कारंडे व त्याचा भाऊ सोमनाथ हे चांभार गल्लीत बोलत थांबले होते. त्यावेळी रोहित कारंडे व अतिष लादे हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. यश कारंडेजवळ दुचाकी थांबवून रोहित कारंडे याने त्याला मी तडीपार असल्याची टिप तू पोलिसांना देतोस का? अशी विचारणा करत शिवीगाळ सुरू केली. यशला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचा भाऊ सोमनाथ सोडवण्यासाठी पुढे आल्यावर संशयित अतिषने सोमनाथला लाकडी दांडक्याने मारहाण केली. संशयित रोहित याने तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत गाडीतील चाकू काढून यशच्या डोक्यात, पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने छापासत्र सुरू करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला. संशयित रोहित कारंडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.