स्थळ आणि दिवस निश्चित
नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात अद्याप तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांचे सैन्य परस्परांसमोर उभे ठाकले आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी सातव्यांदा कमांडर स्तरीय बैठक होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 12 ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे.
पूर्व लडाख सेक्टरमध्ये 12 ऑक्टोबर रोजी कोर कमांडर स्तरीय चर्चा आयोजित होणार आहे. आतापर्यंत दोन्ही देशांनी कोर कमांडर स्तरीय चर्चेचे 6 टप्पे आयोजित केले आहेत. सहाव्या टप्प्यातील चर्चेत भारतात विदेश मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाला सामील करत चीनने स्वतःची भूमिका बदलू नये याची खबरदारी घेतली होती.
यापूर्वी भारत आणि चीन यांच्यात बुधवारी डब्ल्यूएमसीसीची (वर्किंग मॅकॅनिझम फॉर कन्स्लटेशन अँड को-ऑर्डिनेशन) 19 वी बैठक झाली आहे. या बैठकीत भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या डब्ल्यूएमसीसीच्या बैठकीनंतर झालेल्या घडामोडींवर विस्तृत चर्चा केल्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. दोन्ही देशांनी चालू महिन्याच्या प्रारंभी संरक्षणमंत्री आणि विदेशमंत्र्यांदरम्यान झालेल्या बैठकांवरूनही चर्चा केली आहे.