प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची धास्ती प्रचंड वाढली आहे. बेंगळूर येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आलेल्या सुमारे 40 हून अधिक संशयितांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल अद्याप यायचा आहे. जिल्हा प्रशासनाला या अहवालाची प्रतीक्षा असून बुधवारी लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या 18 जणांचे स्वॅब जमविण्यात आले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येणाऱया संशयितांचा ओघ सुरूच आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने बुधवारी सायंकाळी एका बुलेटिनद्वारे दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 1410 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 297 जणांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
जिल्हय़ातील 574 जणांनी चौदा दिवसांचा तर 520 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. मंगळवारी रात्री 40 हून अधिक स्वॅबचे सॅम्पल तपासणीसाठी विशेष वाहनाने बेंगळूरला पाठविण्यात आले असून प्रशासनाला या अहवालाची प्रतीक्षा आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण विभागात 19 जणांवर उपचार करण्यात येत असून कोरोनाने पीडित असलेल्या सात जणांवर स्वतंत्र उपचार करण्यात येत आहेत.
यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्व सात जणांवर स्वतंत्र विभागात उपचार करण्यात येत असून त्यांचे आरोग्य स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्यावर औषधोपचार करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बेळगाव परिसरातील अनेक लॉजमध्ये संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची स्वॅब तपासणी करण्याचे कामही आरोग्य विभागाने हाती घेतले असून या सर्व लॉजवर पोलीस अधिकाऱयांनी लक्ष ठेवले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्लू कॉर्नर विभागात तपासणीसाठी येणाऱया संशयितांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या धास्तीने लोक स्वयंप्रेरणेने या विभागाकडे येत आहेत.
कोरोनाबाधित गावातील नागरिकांना आवाहन
कॅम्प येथील कसाई गल्ली, हिरेबागेवाडी, बेळगुंदी व रायबाग तालुक्मयातील कुडची येथे कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरात निर्बंधित प्रदेश म्हणून जिल्हाधिकाऱयांनी घोषित केले आहे. या परिसरातील नागरिकांनी थंडी, ताप, खोकला, सर्दी, श्वसनाचा त्रास दिसून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देऊन तपासणी करून घ्यावी. न पेक्षा 0831-242485 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.