अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार दि.3 जुलै 2021, सकाळी 9.00
● दिवसभरात 9,407 तपासण्या ● 974 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हीटी रेट 10.35 टक्के ● आकडेवारी पुढे करून लॉकडाऊनची कुऱ्हाड
सातारा / प्रतिनिधी :
महामारीचा सर्वात मोठा विळखा ज्या महाराष्ट्रात बसला, त्यातील 20 हून अधिक जिल्ह्यात केवळ दोन अंकी रुग्ण आढळत आहेत. तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात टेस्टिंग रेट कमी ठेवल्याने पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. केवळ कागदावरचे आकडे पुढे करून पुन्हा एकदा लॉकडाऊनची कुऱ्हाड चालवली गेली आहे. प्रत्येक जबाबदारी जनतेच्या माथी मारून सुरू राहिलेल्या या कारभाराला जाब विचारायला कोणी लोकप्रतिनिधी आहेत की नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, शनिवारी 974 जण बाधित आढळून आले असून, कमी चाचण्या झाल्याने पॉझिटिव्हीटीचा रेट 10.35 टक्के झाला आहे.
प्रशासन गावागावात तपासणी घेण्यासाठी शिबिर घेत आहे. मात्र, त्या शिबिराकडे कोणीही फिरकत नसल्याने तपासणी संख्या रोडावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. काल पॉझिटिव्हीटी रेट हा 10.35 वर गेला होता. गेल्या चोवीस तासात 9407 जणांचे नमुने तपासणी केले, त्यात 974 इतके बाधित आढळून आले. जिल्हाधिकारी यांनी आठवड्यात आलेला पॉझिटिव्हीटी रेट पाहून काहीसे निर्बध कडक केले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आणण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. गावोगावी प्रशासन स्वॕब तपासणी शिबिर घेत आहे. मात्र, गावातील पुढारी मंडळीच स्वॕब तपासणी करत नसल्याने आणि काहीही होत नसताना पॉझिटिव्ह आल्याने 14 दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागेल, या भीतीने त्या शिबिराकडे कोणी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तपासणी कमी झाली असून, त्या प्रमाणात रूग्ण संख्या मात्र तेवढीच असल्याने पॉझिटिव्हीटी रेट वाढत असल्याचे चित्र आहे. कालच्या दिवसात 9,407 जणांचे स्वॕब तपासणी केले गेले त्यात 974 जण बाधित आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यातला पॉझिटिव्हीटी रेट पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल सायंकाळी उशिरा काहीसे निर्बंध वाढवले गेले आहेत. त्यामुळे आधीच गेले पंधरा महिने सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे.
निवडणुकीमुळे कराडात कोरोना वाढण्याची भीती
कराड तालुक्यातील एका कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. त्या निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळी कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पहाता कोरोना पुन्हा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
शनिवारपर्यंत एकूण नमूने 11,06,180, एकूण बाधित 1,96,068, घरी सोडलेले 1,82,150, मृत्यू -4,434, उपचारार्थ रुग्ण-9,839