उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱयांना आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस अधिकाऱयांनी प्रकरणाचा तपास किंवा संशयित आरोपींविषयी कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. तसेच यासंबंधीची मार्गसूची/निर्देश चार आठवडय़ांत तयार करण्याची सूचना राज्य सरकारला दिली आहे.
वकील दीपश्री यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय ओक व न्या. सुरज गोविंदराजू यांच्या पीठाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तपास सुरू असणाऱया प्रकरणांविषयीची कोणतीही माहिती माध्यमांसाठी उघड करू नये. तपास पूर्ण होईपर्यंत आरोपी किंवा फिर्यादीविषयी प्रसिद्धी माध्यमांसमोर माहिती देऊ नये. याबाबत पोलीस अधिकाऱयांना निर्देश द्यावे लागतील. याचे उल्लंघन करणाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई क्हावी, यासाठी नियम तयार करा, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे.
इलेक्ट्रिक व मुद्रण माध्यमांमध्ये तपास सुरू असणाऱया गुन्हय़ांचे वृत्त किंवा अन्य कार्यक्रम असभ्य आणि अश्लील स्वरुपात प्रसारित होऊ नयेत, यासाठी नियम तयार करण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.