नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्सने उर्वरित आयपीएल हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज तबरेझ शमसी याला करारबद्ध केले. राजस्थानने बुधवारी या कराराची घोषणा केली. आयपीएलचा उर्वरित टप्पा दि. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत खेळवला जाणार आहे.
शमसी हा आयसीसीच्या टी-20 मानांकन यादीत गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी विराजमान असून येथे तो राजस्थानसाठी दुसरा बदली खेळाडू या नात्याने संघात दाखल होणार आहे.
जोहान्सबर्गमधील 31 वर्षीय शमसीने यापूर्वी दक्षिण आफ्रिकन प्रथमश्रेणी क्रिकेट लीगमध्ये द टायटन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेतर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले. या डावखुऱया लेगस्पिनरने आजवर खेळलेल्या 39 टी-20 सामन्यात 45 बळी घेतले. शिवाय, 27 वनडे सामन्यात 32 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आयपीएलमध्ये त्याने आरसीबीतर्फे 4 सामने खेळले असून यात 3 बळी घेतले आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन मध्यमगती गोलंदाज ऍन्ड्रय़ू टायने आयपीएलच्या उर्वरित टप्प्यासाठी आपण उपलब्ध असणार नसल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी, पहिल्या टप्प्याच्या अर्ध्यातच त्याने माघार जाहीर करत मायदेशाचा रस्ता धरला होता.
‘मागील वर्षभरात मी सातत्याने खेळत आलो आहे आणि यामुळे साहजिकच, सातत्याने घरापासून लांब रहावे लागले आहे. त्यातच टी-20 वर्ल्डकपसाठी निवड झाली नाही, त्याचे शल्य आहे. एकंदरीत चित्र पाहता, सध्या कुटुंबाला वेळ देऊन त्यानंतर पुढील वर्षातील विश्वचषकाची तयारी करण्यासाठी मी हा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्ससाठी उर्वरित हंगामात खेळू शकणार नाही, याची मला खंत राहील’, असे ऍन्ड्रय़ू टाय राजस्थानतर्फे जारी केले गेलेल्या एका पत्रकातून म्हणाला.