कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पालिका उद्यान खुले
वार्ताहर / सावंतवाडी:
कोरोना महामारीच्या सावटामुळे तब्बल 11 महिने सुने सुने असलेले सावंतवाडी नगरपालिकेचे प्रसिद्ध जगनाथराव भोसले शिवउद्यान शनिवारपासून पुन्हा बच्चेकंपनीच्या चाहूलीने गजबजू लागले आहे. गार्डन खुले झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विरंगुळय़ाचे ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्हय़ात आदर्शवत व मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सावंतवाडीतील शिवउद्यानाची ख्याती सर्वदूर आहे. हे शिवउद्यान गेल्या मार्चपासून महिने बंद होते. आता फेब्रुवारीपासून कोरोनाचे सावट कमी झाल्याने नगराध्यक्ष संजू परब व त्यांच्या टिमने सावंतवाडी शहरातील बंद असलेले प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. विरंगुळाचे ठिकाण असलेले शिवउद्यान शनिवारपासून खुले करण्यात आले आहे.
शिवउद्यान खुले होताच बच्चे कंपनीची पावले उद्यानाकडे वळू लागली आहेत. सध्या तुरळक प्रतिसाद मिळत आहेत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने गार्डनमध्ये मुक्त वातावरणात बच्चे कंपनी झोका घेत आणि हिरव्यागार वनराईत मज्जा मस्ती धमाल करुन लागली आहेत. गेल्या दहा महिन्याहून अधिक काळ घरात बसून असलेल्या बच्चे कंपनीला जानेवारी महिन्यापासून बाहेर पडण्याची मुभा मिळू लागली आहे. त्यामुळे कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने बच्चे कंपनी घराबाहेर पडताना दिसू लागली होती. परंतु सावंतवाडीतील गार्डन खुले झाले नव्हते. त्यामुळे पालक व बच्चे कंपनीचा हिरमोड होत होता. अखेर सहा फेब्रुवारीपासून सावंतवाडीचे गार्डन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दररोज बच्चेकंपनीचा किलबिलाट गार्डनमध्ये पाहायला मिळणार आहे.
पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्यानंतर आता विरंगुळाचे ठिकाण असलेले गार्डनही खुले झाले आहे. या गार्डनमध्ये नवनवीन खेळणी पालिकेने बसवली आहेत. त्यामुळे गार्डन आता कात टाकत आहे. सावंतवाडी लाखे वस्तीतील प्रसाद खोरागडे, इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा सकाळी शाळा आणि संध्याकाळी गार्डनमध्ये पॉपकॉर्न्स विक्री करत आपल्या वडिलांना हातभार लावत आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. कोरोनाने असा नवा धडाही घालून दिला आहे.