राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. सुभाष प्रभूदेसाई
प्रतिनिधी /शिरोडा
शिरोडय़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष प्रभूदेसाई यांनी गेला महिनाभर प्रचारात झोकून दिले होते. या काळात त्यांचा दवाखाना बंदच होता. मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी एक दिवस पूर्ण विश्रांती घेऊन त्यांनी बुधवारी आपला दवाखाना उघडला. सकाळी बरेच रुग्ण त्यांची वाट पाहत थांबले होते.
बाजार-शिरोडा येथे डॉ. प्रभूदेसाई यांचा दवाखाना असून गेली 38 वर्षे या ठिकाणी ते वैद्यकीय सेवा देत आहेत. शिरोडाच नव्हे तर गोव्याच्या विविध भागातून रुग्ण त्यांच्याकडे येतात. एवढय़ा वर्षांत पहिल्यांदाच महिनाभर त्यांचा दवाखाना बंद राहिला. कोरोनाकाळाही त्यांची सेवा कायम सुरु होती. प्रचाराच्या दिवसांत तशी तातडीची गरज भासल्यास ते रुग्णांसाठी उपलब्ध होत. प्रचाराच्या धामधुमीत त्यांनी पूर्ण मतदार संघ पायी फिरुन काढला. सकाळी 9 वा. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते प्रचाराला बाहेर पडत व रात्री पुन्हा घरीपोचेपर्यंत 11.30 वाजत. जेवण खाण तर बाहेरच होत असे. डॉक्टरांच्या खाण्याबाबत फारशा आवडीनिवडी नाहीत. मंगळवारच्या दिवशी घरीच विश्रांती व बऱयाच दिवसांनी वर्तमानपत्रे वाचता आली व टीव्हीवर बातम्याही बघितल्याचे ते सांगतात. घरी आलेले कार्यकर्ते व मित्रांसोबत चहा घेताना मतदानाविषयी चर्चा केली. पत्नीसोबत बऱयाचदिवसांनी एकत्र नास्ताही केला. बुधवारी सकाळी जरा उशिराच 7 वा. उठून एक पायी फेरफटका मारला. देवपूजा, नास्ता आटोपल्यानंतर 10 वा. दवाखाना उघडला. बरेच रुग्ण वाट पाहत थांबले होते. तपासणी आटोपेपर्यंत सायंकाळचे 5 वाजले होते. थोडावेळ घरी विश्रांती घेऊन पुन्हा 6 वा. ते दवाखान्यात गेले व उशिरापर्यंत त्यांची रुग्णसेवा सुरुच होती.