जिल्हा परिषदेचे विशेष यश, शेकडो शिक्षकांच्या चेहऱयांवर फुलले हासू
प्रतिनिधी /सातारा
अनेक वर्षे प्रलंबित असणारी निवड वेतन श्रेणी 2089 सेवानिवृत्त शिक्षकांना मंजूर झाली. तसेच 747 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली. यावेळी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर इत्यादी उपस्थित होते.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेकडो सेवानिवृत्त शिक्षकांच्या तसेच नियमित शिक्षकांच्या चेहऱयावर हसू फुलले आहे. गेली जवळजवळ तीन दशके हा प्रश्न प्रलंबित होता. परंतु यासंदर्भात अथक प्रयत्न करून या शेकडो शिक्षकांना न्याय मिळाला आहे. यासाठी अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. ही प्रक्रिया खूप वर्षे लांबल्यामुळे तशा अर्थाने किचकट होती. अनेक सेवानिवृत्त शिक्षकांशी संपर्क देखील साधावा लागला. हे सर्व करून कार्यप्रणाली ठरविण्यासाठी उपशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार गटशिक्षणाधिकारी आणि चार शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश असलेली विशेष समिती जिल्हा परिषदेने स्थापन केली होती. त्यांनी अथक परिश्रमाने आणि सर्वांग पूर्ण अभ्यास करून आपला अहवाल दिला.
ऑक्टोबर 2017 ते मार्च 2020 अखेर च्या वरिष्ठ वेतनश्रेणी च्या एकूण 747 शिक्षकांना मंजुरी मिळाली. 1 जानेवारी 1986 ते 31 मार्च 2020 अखेरच्या पंधरा वर्षे प्रलंबित असणाऱया एकूण 2089 शिक्षकांना निवड श्रेणी मंजुर झाली आहे. वर्षानुवर्षे अथक सेवा केलेल्या आणि कित्येक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शेकडो शिक्षकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. शिवाय या निर्णयामुळे त्यांना संबंधित रकमेचा फरक खरा देखील प्राप्त होणार आहे. शिक्षक संघटनांनी तसेच सर्व शिक्षकांनी याबाबत सर्व संबंधित अधिकारी आणि एकूणच जिल्हा परिषदेचे विशेष आभार मानले आहेत. कोरोनाच्या संघर्षमय आणि कठीण काळात हे काम सर्वांनीच तडीला लावल्यामुळे शिक्षकांच्या समाधानाचे मोल खूप महत्त्वाचे आहे, अशा भावना अध्यक्ष कबुले यांनी व्यक्त केल्या. संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यांचे कष्ट मोलाचे असून त्यामुळेच शिक्षकांना न्याय मिळाला. असे उपाध्यक्ष विधाते म्हणाले, सर्व शक्य ते प्रयत्न करून सर्व माहिती एकत्र करून हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे एक वेगळाच आनंद होत आहे. जिल्हा परिषद अशाप्रकारे सदैव सकारात्मक दृष्टीने कार्यरत राहील असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी व्यक्त केला. सर्वांच्या योग्य सहकार्यामुळे आणि प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेता आला याचा खूप आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केली. तर खूप महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिक्षकांना समाधान मिळाले, यात वेगळाच आनंद आहे अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी व्यक्त केली. यासर्व प्रक्रियेमध्ये सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबतच समितीतील सर्व सदस्यांनी आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.