शाखा अभियंता महेश नितसुरे यांनी घेतला पुढाकार
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर तालुक्यातील मोडकाघर ते तवसाळ या मार्गाच्या रूंदीकरणामध्ये हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सन 2013मध्ये बांधण्यात आलेला पूल गेली सात वर्षे वापराविना बंदावस्थेत होता. मात्र सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता महेश नितसुरे यांच्या पुढाकाराने या पुलाला जोडरस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे तीन दिवसात या पुलावरून वाहतूक सुरू केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मोडकाघर, पालशेत ते तवसाळ या रस्त्याचे रूंदीकरण सन 2013-14मध्ये करण्यात आले. रस्त्याच्या रूंदीकरणाबरोबर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या अरूंद व अवघड वळणावरील पूल हा धोकादायक ठरल्याने याठिकाणी 20 लाख रूपये खर्च करून सन 2013-14मध्ये नवीन पूल बांधण्यात आला. पूर्वीच्या जुन्या पुलाची रूंदी साडेपाच मीटर आहे, तर नव्या पुलाची रूंदी सव्वाआठ मीटर आहे. मात्र जागेच्या वादामध्ये गेली सात वर्षे पुलासाठी जोड रस्ता तयार केलेला नाही. त्यामुळे नवीन पूल बांधूनही त्याचा वापर नसल्याने जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू होती. जुना पुलही वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाखा अभियंता नितसुरे यांनी अर्थसंकल्पातून या पुलाच्या जोडरस्त्यासाठी तरतूद करून पुलाच्या जोडरस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू केले आहे.
येत्या तीन दिवसात जोडरस्त्याचे खडीकरण पूर्ण होत असून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पावसाळय़ानंतर या जोडरस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. या पुलाला जोड रस्ता काढताना हेदवी येथील तीव्र उतारावरील असलेली वळणे काढून रस्ता तयार केला जाणार होता. परंतु येथील जागा मालकांनी याबाबत आक्षेप घेतल्याने पूल तयार होऊन गेली सात वर्षे त्याचा वापर केला जात नव्हता. परंतु यावर सध्या तात्पुरता जोडरस्ता तयार करून वाहतूक सुरू करण्यात आली असून रस्त्यासाठी आवश्यक जागेसाठी संबंधित जागामालकांजवळ बोलून व शासनाच्या प्रक्रियेनुसार रस्ता तयार केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागातून सांगण्यात आले.