हिंडलगा येथील रक्षक कॉलनीमधील घरावर सीसीआयबीची धाड : दोघांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
बेकायदेशीर दारू विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेल्या घरावर सीसीआयबीने अचानक धाड टाकून तब्बल 13 लाखांची दारू जप्त केल्याने खळबळ माजली असून दारू विक्री करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. सीसीआयबी पोलिसांनी हिंडलगा-विजयनगर येथील रक्षक कॉलनीमध्ये धाड टाकून ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
राजेश केशव नाईक (वय 37, रा. कुमारस्वामी लेआऊट) आणि शंकर बसवंत देशनूर (वय 38, रा. कणबर्गी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी गोवा बनावटीची आणि लष्कर साठय़ामधील उच्च प्रतिची दारू साठा करून ठेवली होती. बऱयाच दिवसांपासून हा व्यवसाय ते करत होते.
सध्या लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे दारूला मागणी वाढणार असल्याने त्यांनी मोठा साठा केला होता.
गोवा बनावटीची 410 लिटर 250 मिली दारू साठा करून ठेवली होती. विविध कंपन्यांच्या एकूण 447 बाटल्या त्यांच्याकडे होत्या. मिलिटरी कॅन्टीनमधील तसेच माजी सैनिकांकडून घेतलेल्या 192 लिटर दारूच्या 203 बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांना दारूचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून रक्षक कॉलनी येथील भाडोत्री घरावर ही धाड टाकण्यात आली.
मिलिटरी ब्रँड धाडीत सापडल्यामुळे खळबळ
जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये एका बाटलीची किंमत 3 ते 5 हजारांपर्यंत होती. त्यामुळे पोलीसही अवाप् झाले. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी गोवा बनावटीचीच दारू विक्री करण्यात येत होती. आता मिलिटरी कॅन्टीनमधीलही दारू धाडीत मिळाल्यामुळे खळबळ माजली आहे. ही दारू कोठून आली तसेच कोणाकडून विकत घेतली, याची चौकशी पोलीस करत आहेत. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.