दर्शनासाठी असलेली ई-पास सक्तीलाही स्थगिती
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोनच्या पार्श्वभूमीवरील शिथिल केलेले निर्बंध व लोकभावना विचारात घेऊन करवीर निवासिनी अंबाबाईसह वाडीरत्नागिरीवरील जोतिबाच्या दर्शनासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या ई-पास सक्तीला शुक्रवारी रात्री स्थगिती दिली. या संदर्भातील माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निवेदनाद्वारे कळवली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल 16 महिने अंबाबाई मंदिराचे बंद ठेवलेले महाद्वार रात्री बरोबर 9 वाजून 35 मिनिटांनी खुले केले. आता या महाद्वारातून भाविकांना अंबाबाईचे मुखदर्शन देण्यालाही सुरुवात केली असल्याचे देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. देवस्थान समितीच्या या महत्वपूर्ण कार्यवाहीमुळे भारतीय जनता पार्टीने रविवारी सकाळी 11 वाजता अंबाबाई मंदिराचे महाद्वार खुले करण्यासाठी हाती घेतलेले आंदोलन थांबवले आहे. मात्र अंबाबाई मंदिराजवळ एकत्र येऊन देवीच्या महाआरतीसह आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.