ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. कारण हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट असून तो स्वतःचे स्वयंप्रतिकार प्रणालीपासून संरक्षण करण्यासाठी सतत त्याचे स्वरूप बदलत राहतो. बी 1.1.529 असे नामकरण करण्यात आलेला हा व्हेरिएंट तब्बल 32 म्युटेंटनी बनलेला आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजचे व्हायरोलॉजिस्ट आणि डॉक्टर टॉम पीकॉक यांनी याबाबतची माहिती एका साईटवर शेअर केली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, जितक्या जास्त म्यूटेशनद्वारे व्हेरिएंट निर्माण होईल तितका तो अधिक प्रभावशाली असेल. त्यामुळे मानवी शरिराला तो मोठय़ा प्रमाणात हानी पोहचवू शकतो. कोरोना लस घेतली असली तरीही जास्त प्रकारच्या म्युटेंटने बनलेल्या व्हेरिएंटपासून शरीराला वाचवणे कठीण होते. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट कोरोनाच्या तब्बल 32 व्हेरिएंटपासून बनला आहे. हीच गोष्ट इतर व्हेरिएंटपेक्षा या व्हेरिएंटला अधिक धोकादायक बनवत आहे.
दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अँजेलिक कोएटजी म्हणाले, मागील 10 दिवसात ओमिक्रॉनचे 30 रुग्ण तपासले. हे रुग्ण साधारण 40 वयोगटील आहेत. त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून, त्यांच्यामध्ये ताप, थकवा, स्नायू दुखणे, घसा दुखणे आणि कोरडा खोकला अशी या नवीन व्हेरिएंटची लक्षणे आढळून आली आहेत. काही रुग्णांमध्ये तापाचे प्रमाण थोडे जास्त होते.