मगो नेते सुदिन ढवळीकर यांची सिंहगर्जना : भाजपशी युती म्हणजे राजकीय आत्मघात
प्रतिनिधी /पणजी
येत्या विधानसभा निवडणुकीत एकाही फुटीराला आणि माकडउडय़ा मारणाऱयाला उमेदवारी देणार नाही असे जाहीर करा, तरच मगो पक्ष काँग्रेस व इतर विरोधी पक्षांबरोबरच्या आघाडीत सामील होणार, अशी अट पक्षाने घातली असून तशी सिंहगर्जना मगो नेते व माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
दैनिक तरुण भारतशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की भाजपकडे युती करणे मगो पक्षाला परवडणार नाही. ज्या पद्धतीने भाजपने मगोला त्रास दिला, अपमानित केले व मगो पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाकडे युती करण्याचा प्रकार हा राजकीय आत्मघात ठरणार आहे, असे ते म्हणाले.
भाजपकडे युती करण्यात अर्थ नाही
गेल्या दोन वर्षाचा भाजपचा कारभार हा अत्यंत भ्रष्ट कारभार आहे. तसेच कोविडमुळे देशात सर्वाधिक माणसे गोव्यात मरण पावली त्याला कारण भाजपचा कारभार आहे. या पक्षाकडे युती करण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. जनतेला स्वच्छ कारभार देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही ते पुढे म्हणाले.
भाजपविरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न
भाजपचा गोव्यात सर्वत्र पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न चालू आहे. आमचा देखील त्याला सशर्त पाठिंबा राहिल. कोणत्याही परिस्थितीत बंडखोर व फुटीरांना पक्षात घेणार नाही असे सर्व पक्षांनी जाहीर करावे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी आपले म्हणणे जाहीर करावे तसे केले तरच विरोधी पक्षांच्या आघाडीत मगो पक्ष सामील होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युतीच्या अटीबाबत काँग्रेसला दिली कल्पना
आपण काँग्रेसच्या नेत्यांना शनिवारी युतीच्या अटींबाबत अधिकृत कळविले आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या काही नेत्यांना आता भाजपमधून निवडणूक जड जाणार असल्याने काहीजण काँग्रेसमध्ये, काहीजण राष्ट्रवादी व दोन नेते गोवा फॉरवर्डमध्ये जाण्याची शक्यता आहे.
अन्यथा मगो पक्ष स्वतंत्रपणे लढणार
फुटिरांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास या निवडणुकीत कोणताही अर्थ रहाणार नाही व विरोधी पक्षांचे महत्व देखील जाईल. त्यामुळे विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीत सामाविष्ट होणाऱया सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन बंडखोर, फुटीर आणि भ्रष्टाचारी असलेल्या या माकडउडय़ा मारणाऱया नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देणार नाही असे जाहीर करावे. असे जाहीर केले तरच मगो पक्ष या आघाडीत समाविष्ट होईल. अन्यथा मगो पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविल.
…तर सांखळीसह सर्वत्र भाजपचा पराभव
भाजपचा गोव्यात दणदणीत पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांच्या उमेदवार उभा केल्यास सांखळीसह बहुतेक मतदारसंघातील भाजप उमेदवारांचा पराभव होईल. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी भाजपमध्ये गेलेल्या कोणत्याही नेत्याशी संपर्क देखील ठेऊ नये. जनतेने निर्णय घेतलेला आहे मात्र विरोधी पक्ष संघटीत रहाणे आवश्यक असल्याचे मत सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.