प्रतिनिधी/ पणजी
लैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तेहलकाचे माजी संपादक तरुणजीत तेजपाल याला नोटीस बजावून पुढील सुनावणी 24 जून रोजी ठेवली आहे.
म्हापसा येथील जलद न्यायालयासमोर या लैंगिक अत्याचार प्रकरणावर सुनावणी झाली होती. दि. 27 मे रोजी निवाडा वाचन झाले व 527 पानी निकाल जाहीर झाला. त्यात संशयित आरोपी तरुणजीत तेजपाल याला सर्व आरोपातून निर्दोष ठरविण्यात आले. सदर निवाडय़ाची प्रत मिळण्यापूर्वीच या निवाडय़ाला गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. सरकारच्यावतीने सोलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
निवाडय़ाची प्रत मिळाल्यावर त्या निवाडय़ातील 84 दोष बुधवारी न्यायपीठासमोर उघड करण्यात आले. या निवाडय़ात त्रुटी असल्याने नव्याने सुनावणी घेऊन निवाडा व्हायला हवा, असे मत सोलिसीटर जनरलनी व्यक्त केले. लैंगिक अत्याचार लिफ्टमध्ये झाला. दुसऱया दिवशीही लिफ्टमध्ये तसाच प्रयत्न झाला. लिफ्टमधून बाहेर आल्यावर त्या मुलीच्या चेहऱयावर भाव कसे होते व हे भाव कॅमेऱयाने टिपले व त्यावरून अंदाज लावून लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार झालाच नव्हता असा निष्कर्ष काढला जावू शकत नाही, असा मुद्दा न्यायपीठासमोर मांडण्यात आला आहे.
ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला ती संशयित आरोपीची सहकारी कर्मचारी होती. सदर घटना उघड झाली तेव्हा कर्मचाऱयामध्ये गृपवर चर्चा झाली. गृपमधील दोघांनी त्या पीडित मुलीच्या वर्तवणकीवर व मागील पार्श्वभूमीवर टिपणी केली होती. त्या दोघांच्या साक्षी गृहित धरून वर्तवणूक आणि पार्श्वभूमीवरून लैंगिक अत्याचार झालाच नाही, असे म्हणता येणार नाही, असा आता आव्हान अर्जात म्हटले आहे.
सदर घटनेवर तेहलकाच्या कार्यालयात चर्चा झाली. व्यवस्थापकीय संपादकापर्यंत तक्रार पोहचली तेव्हा संशयित आरोपीने ई मेल पाठवून त्या पीडित मुलीची माफी मागितली. ई मेल तेहलकाच्या पोर्टलवरून पाठवण्यात आली, सदर पोर्टल तपास अधिकाऱयांन जप्त केला नाही याचा अर्थ ई मेलवरून माफी मागितलीच नाही, असा अर्थ होत नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
सदर संशयिताने मोबाईलवरून संदेश पाठवला व त्या संदेशात दारुच्या नशेत असा खटय़ाळपणा घडतो, असा उल्लेख केला तेव्हा त्या पीडित मुलीने त्या मेसेजला लगेच रिप्लाय दिला आणि लिफ्टमध्ये दोन वेळा सदर प्रकार झाला हा खटय़ाळपणा नसून जाणूनबुजून केलेला प्रकार आहे. तेव्हा आपण दारुच्या नशेतही नव्हते असेही म्हटले होते. इमेल आणि मोबाईलवरील संदेश भक्कम पुरावे ठरतात ते सरळ डावलण्यात आल्याने सदर निवाडा रद्दबातल ठरवावा, आणि या निवाडय़ातून असंवेदनशीलतेचा गाठलेला कळस खोडण्यात यावा व सदर संशयिताला दोषी ठरवण्यात यावे, अशी मागणी न्यायपीठाकडे करण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचारानंतर बळी पडलेल्या पीडितेचे वर्तन कसे असायला हवे या विषयीचा न्यायमूर्तींचा निष्कर्ष असंवेदनशीलतेचा कळस गाठणार आहे. या निवाडय़ामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो अशी बाजू उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली.