प्रतिनिधी / शिर्डी
वयाच्या १८व्यावर्षी पासपोर्ट काढला आणि त्यानंतर दोन वर्षांनी दुबईत व्यवसायासाठी गेलो. ३० वर्षांत आखाती देशांमध्ये व्यवसायाचे मोठे साम्राज्य उभे करून ‘अल अदिल’ हा बॅण्ड दुबईसह आखातातील घराघरात पोहोचवणारे डॉ. धनंजय दातार यांनी जिद्द आणि चिकाटी हेच यशाचे गमक असल्याचे स्पष्ट केले. मराठी तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय उभा करावा, त्यात उलाढाल किती याला महत्त्व न देता फायदा किती? याला महत्त्व देणाराच यशस्वी उद्योजक होऊ शकतो, असे मत दुबईतील मसाले किंग डॉ.धनंजय दातार यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथे शनिवारी आंतरराष्ट्रीय रोटरी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये दातार यांची मुलाखत उत्तरा मोने यांनी घेतली. यावेळी दातार यांनी जीवनातील संघर्ष आणि यशोगाथा सांगितली. ते म्हणाले, “९९८२ साली मुंबईत घराघरात जाऊन फिनेल विक्रीचाव्यवसाय केला त्यातून सेल्समनची भूमिका समजली व त्याचा दुंबईतील व्यवसायात प्रचंड फायदा झाला. सुरुवातीला कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर लखपती, करोडपती आणि अब्जाधीश होण्याची स्वप्ने पूर्ण झाली.
आखातात सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत १६ वे स्थान मिळाले. फोजच्या यादीतही ३२ वे स्थान मिळाले. किराणा दुकानापासून सुरू झालेल्या या प्रवासाचे रूपांतर आता ४३ देशांमधील मोठ्या सुपर मार्केटमध्ये झाले आहे. ‘अल अदिल’ बॅण्ड घराघरात पोहोचला आहे. वयाच्या २० व्या वर्षी आईचे दागिने मोडून दुबईला जाताना यशस्वी उद्योजक होऊन भारतात परतण्याचे स्वप्न पाहिले होते. ते अवघ्या तीन वर्षांत पूर्ण करून भारतात येताच आईचे दागिने पुन्हा तयार करून दिले, ही जीवनातील सर्वात समाधानाची बाब आहे. शिक्षण आणि व्यवसाय यांचा परस्पर कोणताही संबंध नाही.
दहावीत गणित या विषयात पाच वेळा नापास झाल्याचा कोणताही अडथळा मला यशस्वी उद्योजक होण्यापासून रोखू शकला नाही. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, गरीबीवर मात करण्यासाठी जिद्द असेल तर प्रत्येक संकटावर मात करता येते. त्यानंतरच यश मिळते. मराठी माणूस फक्त नोकरीचकरू शकतो, या विचाराला बाजूला सारून तरुणांनी उद्योग व्यवसायात बिनधास्त उतरावे.
सर्व काही शक्य आहे. फक्त स्वप्न पहावीत आणि ती सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. कोणत्याही व्यवसायात स्थिर होऊन समृद्धीसाठी किमान तीन वर्षे वाट पहावी लागते. तोपर्यंत धीर सोडू नका. मला स्वत:ला काम करण्याची कधीच लाज वाटली नाही. लोकांनाही हवे ते, आवडेल ते काम देण्याचा प्रयत्न केला. त्यातून आज ‘मसाला किंग’ म्हणून एका मराठी तरुणाने आखातात स्थान निर्माण केले याचा मला अभिमान आहे, असेही डॉ. दातार म्हणाले.