मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
कबलापूर आणि गोकाक रोडवरील खनगाव परिसरात असलेल्या कल्याळ पुलाजवळ एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून आहे. निशिकांत सुभाष दहीकांबळे (वय 31, मूळचा उगीर, जि. लातूर, सध्या रा. अंजनेयनगर, बेळगाव) असे त्या तरुणाचे नाव आहे.
खनगाव गावाजवळ कल्याळ पूल आहे. त्याच्या शेजारी गळा चिरुन तरुणाचा खून झाल्याचे काहींच्या निदर्शनास आले. तातडीने या घटनेची माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. मारिहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर हे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
निशिकांत हा अंजनेयनगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. मात्र बुधवारी रात्री 8 वाजता त्याला कुणाचा तरी फोन आला. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला. मात्र रात्री उशीरापर्यंत घरी परतलाच नाही. त्यामुळे घराच्यांनीही त्याचा शोध घेतला. निशिकांत याच्याबद्दल मारिहाळ पोलिसांनी माहिती काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
निशिकांत यांच्या गळय़ावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. गळा पूर्ण चिरला असून तीन ते चार जणांनी त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मारिहाळ पोलिसांनी घटनेची नोंद करुन घेवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.