19 व्या वर्षात केले सोलो रायडिंग : राजवीर रायबागीचा एकूण 6 हजार 700 कि.मी.प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
मनात आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे बेळगावच्या तरुणाने दाखवून दिले आहे. अवघ्या 19 व्या वषी भाग्यनगर नववा क्रॉस येथील राजवीर किरण रायबागी या तरुणाने तब्बल 33 दिवसांमध्ये बेळगाव- नेपाळ-बेळगाव असे सोलो बाईक रायडींग केले. हा त्याचा पहिलाच प्रवास असून, कमी वयात नेपाळ प्रवास करणारा तो एकमेव तरुण ठरला आहे.
राजवीर बीबीएचे शिक्षण घेत आहे. आपणही सिक्कीमपर्यंत सोलो बाईक रायडींग करावे या उद्देशाने 26 ऑक्टोबरपासून त्याने प्रवासाला सुरुवात केली. हैदराबाद, नागपूर, रेवा, वाराणसी, बिहार, दार्जिलिंग असा प्रवास करत तो सिक्कीम जगातील उंच शिखरांमध्ये दुसऱया स्थानी असलेल्या गुरू डोंगारलेक (17,700 फूट) उंच शिखरावर पोहोचला. यावेळी ऑक्सिजनची कमतरता असल्याने थोडा त्रासही जाणवला. परंतु आत्मविश्वास ढळू न देता त्याने आपला प्रवास सुरूच ठेवला.
नेपाळला जाण्यासाठी मिळाली प्रेरणा
सिक्कीमपर्यंतचा प्रवास करून तो माघारी बेळगावला फिरणार होता. परंतु सिक्कीम येथे त्याला काही मित्रमंडळी भेटली. त्यांच्या सोबत त्याने नेपाळपर्यंतचा प्रवास करण्याचा विचार केला. इंडो-चायना बॉर्डर पाहिल्यानंतर तो काठमांडू येथे गेला. तेथे महादेवाची अनेक मंदिरे असून, तेथे तो भ्रमंती करून आला. नेपाळ येथे आसपासच्या भागाला भेटी देऊन तो पुन्हा बेळगावच्या दिशेने मार्गस्थ झाला. एकूण 6 हजार 700 किलोमीटरचा प्रवास करून तो पुन्हा बेळगावला परतला आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.