अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये धंधुका शहरात हिंदू तरुणाच्या हत्येवरून पसरलेला तणाव आता इतर शहरांमध्येही पसरला आहे. याच्या निषेधार्थ धंधुका, बोताड, रानपूर तीन दिवसांपासून बंद आहे. अहमदाबाद जिह्यातील बावला तालुक्यातही अनेक हिंदू संघटनांनी शनिवारी बंद पुकारला होता. या बंददरम्यान जमाव अनियंत्रित झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सोशल मीडियावर एका वादग्रस्त पोस्टवरून संतप्त कट्टरवाद्यांनी 25 जानेवारी रोजी किशन भारवाड यांची भरदिवसा गोळय़ा झाडून हत्या केली होती. सदर तरुणाने 6 जानेवारीला सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या हत्येप्रकरणी शार्प शूटर्ससाठी पिस्तूल आणि पाच काडतुसांची व्यवस्था करणारा मौलाना अयुब जवरवाला याला अटक झाल्यानंतर तणावात आणखी भर पडली आहे. या हत्येप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी शब्बीर उर्फ सबा दादा चोप्रा (25) आणि इम्तियाज (27, रा. धुंडका) यांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर अहमदाबादमधील जमालपूर येथील मौलाना मोहम्मद अयुब युसूफभाई जवरवाला याला अटक करण्यात आली होती.