आत्महत्येमागे गुढ असल्याचा संशय : पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले
प्रतिनिधी / म्हापसा
सकलवाडा बस्तोडा येथे भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया ऐश्वर्या सुर्यवंशी या 21 वर्षीय मुलीने राहत्या घरात पॅनला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून आत्महत्या करण्यात आली ती खोली एकदम छोटी असून मयत ऐश्वर्या लांब असल्याने तेथे आत्महत्या करणे कठीण प्रकार असल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेल्या खोलीत मयताने ‘मला माफ करा’ असा संदेश आरशावर लिहीला आहे तसेच मरण्यापूर्वी त्या मुलीने आपल्या प्रियकराला आपण आत्महत्या करते असा संदेश पाठविला असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या आत्महत्येबाबत बस्तोडा गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
ही मुलगी मुळ मयडा येथील रहिवासी असून लॉकडाऊन होण्यापूर्वी ती मुलगी सकलवाडा बस्तोडा येथे रहायला आली होती तर काहींच्या म्हणण्यानुसार ही मुलगी पूर्वीपासून येथे राहत होती. रात्री अपरात्री ती आपल्या खोलीत ये-जा करीत होती अशी माहिती येथील रहिवाशीयांनी दिली. मयत ऐश्वर्या आपल्या अन्य दोघां मैत्रिणींसमवेत सकलवाडा येथे आग्नेलो (फोंडा) यांच्या खोलीत भाडेपट्टीवर राहत होत्या. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत त्यांच्या मित्रमैत्रिणींनी मिळून एकत्रित पार्टीचे आयोजनही केले होते. तेथे सर्वांनी मिळून मौजमजाही केली होती अशी माहिती हाती आली आहे.
बुधवारी ऐश्वर्या घरात खोलीवर एकटीच होती. सकाळी आजूबाजूच्या लोकांनी तिला पाहिलेही होते मात्र सायंकाळच्यावेळी हे वृत्त हाती आल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान मयत ऐश्वर्याचा मामा प्रेमानंद तोरस्कर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्याचे पालक कामाला विदेशात असतात. आपल्या भाचीच्या आत्महत्येमागे तिच्या प्रियकराचा हात असून त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी म्हापसा पोलिसांकडे केली आहे. ऐश्वर्या आत्महत्या करणारी मुलगी नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रियकराने तिला लटकताना काढले
दरम्यान ऐश्वर्याच्या प्रियकराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्याने आपल्यास आपण आत्महत्या करणार असल्याचा संदेश पाठविल्यावर आपण पणजीहून त्वरित बस्तोडा येथे आलो. घराचे दार खुलेच होते आपण घरात गेलो असता ऐश्वर्या खोलीत पॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळऊन आल्यावर आपण घरात गेलो व चाकूने दोरी कापून तिला बॅडवर झोपविले मात्र ती मरण पावल्याचे समजल्यावर आपण त्वरित पोलिसांना फोन केला व पोलिसांना बोलावून घेतले.
दरम्यान मरण्यापूर्वी ऐश्वर्याने घराच्या भिंतीवर ‘आय लव यू ऑल’ ‘प्लीज फॉरगीव मी’ असे इंग्रजीत लिहिल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून ऐश्वर्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमॅकोत पाठवून दिला आहे. वैद्यकीय शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. म्हापसा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
भाडेकरूंचा अहवाल घेणार- सरपंच रणजीत उसगावकर दरम्यान बस्तोडचे सरपंच रणजीत उसगांवकर म्हणाले, सकलवाडा बस्तोडा येथे आत्महत्या केल्याची माहिती आपल्यास मिळाल्यावर आपण त्वरित घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती पोलिसांना दिली. गावात भाडेकरूंची माहिती यापुढे पंचायतीला देणे बंधनकारक करणार असल्याचे ते म्हणाले. अशाने गावचे नाव खराब होते. सध्या सर्वत्र कोरोना फैलाव असून गावात कोणकोण कुठे भाडेकरू राहतात त्यांचा अहवाल आपण पंचायतीत नोंद करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.