प्रतिनीधी / कडेगाव :
येथे अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी संशयित आरोपी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस हे आज कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाले त्यांना अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसापुर्वी अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिच्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक हसबनिस यांच्या विरोधात संबंधित पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस याच्याविरुद्ध २८ ऑगस्ट २०२० रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी हसबनिस यानी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला होता. जिल्हा न्यायालयात पिडीतेच्या वतीने अॅड. अमित शिंदे यांनी बाजू मांडली होती. दरम्यान पोलीस व्यवस्थित तपास करीत नसल्याने गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची विनंती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. त्यामुळे आरोपीस जामीन दिल्यास माझ्या जीवितास धोका आहे. संशयिताकडून पुरावे नष्ट केला जाण्याची शक्यता असल्याचे पीडिताने दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले होते.
आज हसबनिस कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. दरम्यान याबाबत जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हसबनिस याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता तर उच्च न्यायालयानेही हसबनिस याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.