प्रतिनिधी / पणजी
तरुण तेजपाल प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातील हलगर्जीपणाचा फायदा मिळाल्याने सदर संशयित आरोपी लैंगिक अत्याचार प्रकरणातून दोषमुक्त झाला. जलद गती न्यायालयाने दिलेल्या या निवाडय़ाला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून सुनावणी येत्या 27 मे रोजी ठेवण्यात आली आहे. लहानसहान तफावतीमुळे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयिताला पूर्णपणे निर्दोष ठरवता येत नाही, असे या आव्हान याचिकेत म्हटले आहे.
या आव्हान याचिकेप्रमाणे तेहलका या नियतकालिकाच्या वतीने गोव्यात 2011 ते 2013 अशी तीन वर्षे थिंक फेस्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 2013 मधील कार्यक्रमावेळी तेहलकाच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते.
सदर युवती त्या अस्थापनात 2009 पासून काम करीत होती. 2011 सालच्या कार्यक्रमात तिला आमंत्रण पत्रिकांची जबाबदारी देण्यात आली होती. 2012 साली तिला पत्रकार परिषद आयोजन करण्यासंबंधी जबाबदारी होती व 2013 च्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे तथा हॉलिहूड अभिनेता व निर्माता रॉबर्ट दी निरो यांचे स्वागत करण्याची व त्यांना सहाय्य करण्याची जबाबदारी होती.
कथित अत्त्याचार प्रकरण 2013 सालचे
दि. 7 नोव्हेंबर 2013 रोजी बांबोळी येथील तारांकित हॉटेलच्या सातव्या ब्लॉकमधील लिफ्टमध्ये सदर कथित लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला. परत दुसऱया दिवशी दि. 8 नोव्हेंबर 2013 रोजी तसाच प्रकार घडला अशी तक्रार होती. सदर घटने संदर्भात दि. 26 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपीने त्या पिडित युवतीला एस.एम.एस. संदेश सकाळी 8.43 वा. पाठवला. तिने 8.49 वा. त्याला उत्तर दिले. तसेच तिने तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादकांना मेल पाठवला. त्याचे उत्तर प्रत्युत्तर आले. शेवटी संशयित आरोपीने पिडित युवतीला मेल पाठवून माफी मागितली. हे पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.
पोलिसांचा हलगर्जीपणा नडला
हे संभाषण तेहलकाच्या सर्वरवर चालले होते. पुरावा म्हणून संभाषण सादर केले, पण पोलिसांनी सर्वर जप्त केला नाही. पोलिसांचा सदर हलगर्जीपणा नडला. त्याचा फायदा संशयित आरोपीला मिळाला.
लिफ्टमध्ये सदर लैंगिक अत्याचार घडला. लिफ्टमध्ये जाताना आणि बाहेर येतानाचे चित्रिकरण न्यायालयाने तपासले होते. काही त्रुटीचा असा सरसकट फायदा संशयित आरोपीला दिला जाऊ शकत नाही, असे आव्हान याचिकेत नमूद करण्यात आले आहे.