युटय़ुब चॅनेलद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : आजपासून विद्यार्थ्यांना व्हिडिओ उपलब्ध होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
तरुण भारत प्रस्तूत व कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ यांच्या सहकार्याने ‘तरुण भारत न्यूज’ या युटय़ुब चॅनेलवर ‘दहावी अभ्यासमाला’ सुरू करण्यात आली आहे. दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना युटय़ुबच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. विविध विषयांतील तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार दि. 26 पासून हे व्हिडिओ विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
दहावीची परीक्षा दि. 25 जूनपासून सुरू होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांचा मानसिक कोंडमारा होत आहे. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मध्यंतरी सुटी मिळाली असली तरी पुढे परीक्षा असल्याने सुटीही व कैदही असल्याचे असे चित्र होते. परीक्षेला आता थोडेच दिवस उरले आहेत. त्यामुळे नेमका अभ्यास कसा करावा? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
सरकारी पातळीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युटय़ुब चॅनेल तसेच चंदन टीव्हीवरून मार्गदर्शन करण्यात येत आहे. परंतु मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे तरुण भारतने पुढाकार घेऊन ‘दहावी अभ्यासमाला’ सुरू केली आहे. यामध्ये तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
मंगळवार दि. 26 पासून या व्याख्यानमालेतील व्हिडिओ युटय़ुब चॅनेलवर उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा बेळगावसह जिल्हा, इतर जिल्हय़ातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध नसतील त्यांना शिक्षक, जागरूक नागरिक, युवक मंडळांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभ्यासमालेचा झाला शुभारंभ
या दहावी व्याख्यानमालेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नेहमीच मराठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ तरुण भारतने उपलब्ध करून दिल्याने माध्यमिक शिक्षक संघातर्फे आभार मानण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, बौद्धिक प्रमुख भास्कर देशपांडे, उमेश कुलकर्णी, सुरेश कळ्ळेकर, सुभाष बराठे, घनश्याम भोसले, संदीप सुतार, रणजित चौगुले, छत्रू पाटील, अश्विनकुमार पाटील, विश्वास गावडे उपस्थित होते.