ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेसारखा बलाढय देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेला लवकरात लवकर कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही तर 2 लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, असा भीतीदायक अंंदाज अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शन डिसिसचे संचालक डॉ. ॲन्थनी फौसी आणि डेबोराह बिरक्स यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 88 हजार 592 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4055 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आर्थिक महासत्ता म्हणून जगावर दबदबा असलेली अमेरिका आता कोरोना विषाणूमुळे हादरली आहे.
अमेरिकेत कोरोनाला रोखण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही. ट्रम्पही या भीषण संकटापुढे हतबल झालेले दिसत आहेत.
अँथनी फौसी आणि डेबोराह बिरक्स म्हणाले की, अमेरिकेत सर्व काही लॉकडाऊन करून, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करुनही 1 लाख ते 2 लाख 40 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. जर काहीच केले नाही तर अमेरिकेत 1.5 मिलियन ते 2 मिलियनपर्यंत मृत्यूचा आकडा वाढू शकतो, असे या दोघांनी इशारा देत म्हटले आहे. डेबोराह बिरक्स यांनी एक तक्ता सादर करत म्हटले की, देशात या आजारामुळे एक लाख ते 2 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग काम करत आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसत आहे. कदाचित हिच आतापर्यंतची सर्वांत चांगली रणनीति आहे.