पारंपरिक मच्छीमारांनी दिला इशारा
सहाय्यक मत्स्य आयुक्तांची भेट
वार्ताहर / मालवण:
एलईडी मासेमारीवर केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातली असूनही आज राजरोसपणे एलईडी दिव्यांच्या साहय़ाने बेकायदेशीररित्या पर्ससीन मासेमारी सुरूच आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत मासेमारीवर जर शासन व प्रशासनाला कारवाई करता येत नसेल, तर शासनाने पारंपरिक मच्छीमारांना एलईडी पर्ससीन नौका पकडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागनाथ भादुले यांच्याकडे केली.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, महेश कोयंडे, चैतन्य तारी, प्रवीण कुबल, बाबू आचरेकर, आबा पराडकर, दाजी जोशी आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मत्स्य अधिकाऱयांची भेट घेऊन एलईडी पर्ससीन मासेमारीवर कारवाई का होत नाही, असा सवाल केला. पर्ससीन नौका 12 सागरी मैल<ापलिकडे राष्ट्रीय हद्दीत मासेमारी करून स्थानिक बंदरात येत असल्या, तरी राज्याच्या हद्दीत पर्ससीन नेट मासेमारीवर 1 जानेवारीपासून बंदी लागू आहे. त्यामुळे या बंदीस अनुसरून पर्ससीन नेट मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली. यावेळी भादुले यांनी परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर आणि मुरारी भालेकर यांना आपल्या दालनात बोलावून घेत पर्ससीन नेट नौका मासेमारी करून स्थानिक बंदरांमध्ये येत असल्यास या नौकांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली.
सहाय्यक मत्स्य आयुक्तांची हतबलता
भादुले यांनी मत्स्य विभागाकडे असलेल्या अपुऱया साधनांचा पाढाच वाचला. एलईडी, पर्ससीन नौका पकडण्यासाठी केवळ एकच गस्ती नौका आहे. एकाच गस्ती नौकेने कुठे-कुठे पोहोचणार? केवळ तीन परवाना अधिकाऱयांच्या मदतीने जिल्हय़ातील कामे कशी करायची? मच्छीमार बांधव नेहमी मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांना धारेवर धरतात. परंतु मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत बोलत नाहीत. एलईडी नौकांवर कारवाई करत असताना पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. अशाही स्थितीत आम्ही एलईडी नौकांवर कारवाई करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
एलईडी आहे म्हणून पर्ससीन आहेत!
चर्चेवेळी भादुले यांनी पर्ससीन नेट मासेमारीसंदर्भात महत्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, एलईडी दिव्यांच्या साहय़ाने होत असलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळेच आज पर्ससीन नेट मासेमारी टिकून आहे. अनेक पर्ससीन नौका आज बंद स्थितीत उभ्या आहेत. काहींनी आपल्या पर्ससीन नौका विकायला काढल्या आहेत. त्यामुळे एलईडी मासेमारीस पायबंद बसला, तर पर्ससीन नेट मासेमारीसुद्धा आपोआपच बंद होईल, असे भादुले म्हणाले.