वृत्तसंस्था / झ्युरिच :
कोव्हिड 19 च्या उद्रेकामुळे यावर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. मात्र पुढील वर्षीही आयोजन न झाल्यास ती स्पर्धाच रद्द केली जाऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाक यांनी म्हटले आहे.
गेल्या मार्चमध्ये आयओसी व जपान सरकार यांनी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. कोरोना व्हायरसचे पूर्ण निर्मूलन झाले नाही तर पुढील वर्षीही ऑलिम्पिकचे आयोजन होऊ शकणार नाही, असे जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेमागील भावना आम्ही समजू शकतो, असे बाक यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले.
‘त्यांच्या भावना मी समजू शकतो. कारण सुमारे 3 ते 5 हजार कर्मचाऱयांना आयोजन समितीत तुम्ही कायम ठेवू शकत नाही. याशिवाय जगभरातील प्रमुख क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक वरचेवर बदलता येणेही शक्य होणार नाही. अशामुळे क्रीडापटूंतही अनिश्चितता निर्माण झाल्याने त्यांच्या कामगिरीवर, तयारीवरही परिणाम होऊ शकतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कोणत्याही परिस्थितीत पुढील वर्षी ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यास आयओसी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. क्रीडापटूंना क्वारंटाईन करण्याची वेळ आली किंवा अन्य कोणती विपरीत स्थिती निर्माण झाली तरी त्यास आम्ही सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असेही ते म्हणाले.
‘विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता विचारात घेतल्यानंतरच ही स्पर्धा पूर्णत्वास नेणे खूप कठीण कार्य असल्याचे आम्ही म्हणत आहोत. कारण अनेक पर्याय, समस्या निर्माण होणार असल्याने त्यावर मात करणे सोपे जाणार नाही. पुढील वर्षी 23 जुलै रोजी जगाची स्थिती कशी असेल, ते पाहिल्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्यावेळीच योग्य तो निर्णयही घेतला जाईल,’ असेही बाक म्हणाले.