बैठकीत मडगाव पालिकेचे नगरसेवक दामोदर शिरोडकर यांचा इशारा, मुख्याधिकारी – अभियंत्यांशी शाब्दिक बाचाबाची
प्रतिनिधी / मडगाव
प्रभागातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने मडगाव पालिकेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी मुख्याधिकाऱयांनी बोलाविलेल्या बैठकीत संताप व्यक्त केला. यावेळी संतापलेल्या नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी आपला प्रभागात पडून असलेला कचरा दोन दिवसांत न उचलला गेल्यास तो मुख्याधिकारी आणि पालिका अभियंत्यांच्या दारात आणून टाकला जाईल, असा इशारा दिल्याने मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस व पालिका अभियंता दिनिज डिमेलो संतापले. यावेळी नगरसेवक शिरोडकर व सदर अधिकाऱयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एक वेळ मुख्याधिकारी बैठक सोडून जाण्यासाठी जागेवरून उठले, मात्र नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी समजूत काढताना हाताबाहेर जाणारी शाब्दिक बाचाबाची थांबविली.
आपल्या प्रभागात मागील महिन्याभरात दोन वेळा फिरत्या पद्धतीने कामगार पाठवून गटारे, नाल्यांची सफाई व अन्य सफाईकामे करून गाळ व कचरा तेथेच टाकून देण्यात आला आहे. सदर कचरा उचलण्यासाठी मुख्याधिकारी व पालिका अभियंता काहीच हालचाली करत नाहीत. आपण वेळोवेळी यासंदर्भात पाठपुरावा केला, तरी कामे होत नसल्याने आमचा नगरसेवक म्हणून काय उपयोग आहे. प्रभागातील लोक पडून असलेला गाळ व कचऱयाची छायाचित्रे काढून समाजमाध्यमांवर टाकत आहेत. अशाने आम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच आपण कचरा अधिकाऱयांच्या वा पालिकेच्या दारात नेऊन टाकण्याचा इशारा दिल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले व आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
‘काहीही बोलल्यास ऐकून घेणार नाही’
मुख्याधिकारी फर्नांडिस यांची प्रतिक्रिया जाणली असता सध्या सोनसडय़ावर जागा उपलब्ध नसल्याने कदंब बसस्थानकाच्या नजीक जी-सुडाच्या जागेत कचरा टाकण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र तेथे ट्रक नेण्यासाठी रस्ता करावा लागणार आहे. तेथे काही खासगी बसगाडय़ा उभा केल्या जात असून रस्ता करण्याच्या बाबतीत बसमालकांकडून अडवणूक होत आहे. या ठिकाणी परवागनी दिलेल्या संख्येपेक्षा कित्येक पटींनी जास्त बसगाडय़ा उभ्या केल्या जात आहेत. यासंदर्भात सर्वेक्षण करून संबंधितांना अहवाल पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर हा प्रश्न सुटणार असल्याचे ते म्हणाले. नगरसेवकाने आपल्या दारात कचरा टाकण्यात येईल असा इशारा दिल्याने आपणास ही बाब योग्य वाटली नाही. आम्ही सरकारी अधिकारी असून आम्हाला मान-सन्मान न देता काहीही बोलले गेले, तर आपणही ते ऐकून घेणार नसल्याचे मुख्याधिकाऱयांनी स्पष्ट केले.
अन्य नगरसेवकांकडूनही कामे होत नसल्याबद्दल नाराजी
आपल्या प्रभागात पडून असलेला कचरा ट्रक उपलब्ध नसल्याने हटविला जात नसल्याचे सांगण्यात आल्याने आपण स्वखर्चाने खासगी ट्रक वापरून गाळ उचलल्याची माहिती नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक यांनी दिली. नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी आपल्या प्रभागातील झाडांच्या कापलेल्या फाद्या, कापलेले गवत तसेच गटार उपसून काढलेला गाळ महिनाभर झाला, तरी उचलला जात नसल्याने संताप व्यक्त केला.