युरोपचा तेलपुरवठा रोखण्याची रशियाची धमकी
वृत्तसंस्था / मॉस्को
युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून रशियाला अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या कठोर आर्थिंक निबंधांना तोंड द्यावे लागत आहे. स्विफ्टमधून वगळल्याने आणि अनेक बँकांवर निर्बध लादण्यात आल्यावर अमेरिकेने रशियाच्या कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत युरोपला होणारा वायूपुरवठा रोखण्याची धमकी दिली आहे. तसेच कच्च्या तेलाचा दर 300 डॉलर्स प्रतिबॅरलहून अधिक होऊ शकतो अशा शब्दांत रशियाने पाश्चिमात्य देशांना इशारा दिला आहे.
रशियाचे कच्चे तेल नाकारण्यात आल्यास जागतिक बाजारपेठेवर याचे भयानक दुष्परिणाम होतील. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अशी तेजी येईल, ज्याचा अनुमान देखील लावला जाऊ शकत नाही. कच्च्या तेलाचे दर अधिक वाढले नाही तरीही तो 300 डॉलर्स प्रतिबॅरलवर जाणार असल्याचे रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि त्याचे सहकारी युरोपीय देश रशियाच्या कच्चे तेल आणि गॅसच्या आयातीवर बंदी घालण्याची तयारी करत असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी म्हटले होते. त्यांच्या या टिप्पणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर्स प्रतिबॅरलनजीक पोहोचले आहेत. हा दर 2008 नंतरचा सर्वाधिक ठरला आहे. अमेरिका आणि त्याचे सहकारी देश रशियाच्या कच्चे तेल आणि वायूवर बंदी घातल्यावर होणारी उलथापालथ रोखण्यासाठी इराणला पुन्हा कच्चेतेल बाजारात आणण्याचाही प्रयत्न करत आहेत. याकरता इराणसोबतचा आण्विक करार पुन्हा लागू करण्याची योजना आहे.
वर्षभरातही होणार नाही भरपाई
रशियाकडून मिळणाऱया कच्च्या तेलाची भरपाई करण्यास वर्षभराहून अधिक कालावधी युरोपला लागणार आहे. याचबरोबर युरोपला अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. युरोपीय नेत्यांनी प्रामाणिकपणे स्वतःच्या लोकांना काय घडणार हे सांगावे. रशियाचा ऊर्जा पुरवठा रोखल्यास आम्हाला आमचे कच्चे तेल कुठे विकायचे हे माहित असल्याचे रशियाच्या नेत्याने म्हटले आहे.
जर्मनीवर रशिया नाराज
जर्मनीकडून नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइनचे सर्टिफिकेशन गोठविण्यात आल्याने रशियाने नाराजी व्यक्त केली आहे. युरोपच्या वायू पुरवठय़ात 40 टक्के योगदान रशिया देत आहे. तरीही जर्मनीच्या कारवाईनंतर यापासून मागे हटण्याचा रशियाला पूर्ण अधिकार आहे. नॉर्ड स्ट्रीम 2 वर बंदी घालण्याप्रकरणी आमच्याकडे तशाचप्रकारचे पाऊल उचलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही नॉर्ड स्ट्रीम 1 गॅस पाइपलाइनमधून गॅसचा पुरवठा रोखू शकतो असा इशारा रशियाच्या उपपंतप्रधानांनी दिला आहे.