दुसऱयाच दिवशी तक्रार दाखल करू : 16व्या दिवशी त्या मंत्र्याचे नाव उघड करणार
प्रतिनिधी / पणजी
चारित्र्यहिनतेमुळे डागाळलेल्या त्या मंत्र्यावर कारवाई करण्याची धमक नसेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावा. दुसऱयाच दिवशी आम्ही पुरावे सादर करू, असे खुले आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ’तो’ व्हिडिओ तर पाहिला आहेच. त्यांनी तो कुठे पाहिला तेही आम्हाला माहित आहे. त्यामुळे अज्ञानपणाचे सोंग घेऊन मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.
आता केवळ दिलेली मुदत संपण्याची प्रतीक्षा
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा 16व्या दिवशी आम्ही त्या मंत्र्याचे नाव उघड करणार आहोत, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे संबंधित मंत्र्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही राजकीय स्टंटबाजी करत नाही, हवेत गोळीबारही करत नाही. केवळ दिलेली मुदत संपण्याची प्रतीक्षा करत आहोत, असे ते म्हणाले.
मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना महागात पडणार
सदर प्रकरण उघड केले तेव्हा आपण कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतले नाही किंवा त्या महिलेचेही नाव घेतले नव्हते. परंतु या प्रकरणात जेवढी माहिती मला आहे तेवढेच मुख्यमंत्रीही त्याबद्दल जाणत आहेत. त्यांनीही तो व्हिडिओ पाहिलेला आहे. तरीही ते आम्हाला खोटे ठरविण्याचे प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांची ही कार्यपद्धती पाहता, हे प्रकरण जेवढे त्या मंत्र्याला भोवणार आहे त्यापेक्षा दुप्पट मुख्यमंत्र्यांना महागात पडणार आहे, असा इशारा चोडणकर यांनी दिला.
कोणाचेही नाव घेतलेले नसताना नोटीस
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे, कोणाचेही नाव उघड न केलेल्या या प्रकरणात आपणाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. याचाच अर्थ सदर प्रकरण घडले आहे या आपल्या दाव्याला पुष्टी मिळते, असे चोडणकर म्हणाले. मुंबईच्या एका कायदा कंपनीकडून पाठविलेल्या या नोटीशीत एका महिलेच्या नावाचाही उल्लेख आहे. गरीबीमुळे आपणास ते करणे भाग पडल्याचे तिने म्हटले आहे. कदाचित त्यात तथ्यही असेल. परंतु एवढी गरीब महिला एवढय़ा महागडय़ा कायदा कंपनीमार्फत नोटीस कशी पाठवू शकेल? यावरून एकतर त्या महिलेचा बोलविता धनी कुणी वेगळाच असावा किंवा संशयित मंत्र्याने स्वतःच एखाद्या महिलेच्या नावे ती नोटीस पाठविली असू शकते, असे चोडणकर म्हणाले.
दरम्यान, सदर पीडित महिलेने तक्रार करावी, या मुख्यमंत्र्यांच्या मागणीचीही चोडणकर यांनी खिल्ली उडविली. एका मंत्र्याविरुद्ध पीडित महिला तक्रार करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री कशी धरू शकतात? अशी विचारणा त्यांनी केली. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आधी त्या मंत्र्याला काढून टाकावे, त्यानंतर पीडिता तक्रार करण्यास पुढे येईल, असे चोडणकर म्हणाले. या प्रकरणात सरकारवर दबाव आणण्यासाठी मीडियानेही सदर महिलाचा आवाज बनावे असे आवाहनही त्यांनी केले.