दोडामार्ग भाजपचा इशारा : वारंवार वीजपुरवठा खंडित
वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यात सतत विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी भाजप तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांनी कार्यकारी अभियंता लोकरे यांची भेट घेत दोडामार्ग शहरासह तालुक्यातील वीज समस्यांचा पाढा वाचला होता. त्यावेळी लोकरे यांनी यापुढे तक्रार येणार नाही, असे सांगितले होते. मात्र, गेल्या सोमवार व मंगळवारी दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुका विजेविना अंधारात होता. त्यामुळे येत्या आठ दिवसात तिलारी-कोनाळ ते सासोली सबस्टेशन ही लाईन दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा दोडामार्गातील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा नानचे यांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे की, इन्सुली ते सासोली सबस्टेशन लाईनमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी तिलारी-कोनाळ येथील महालक्ष्मीचा विद्युत पुरवठा दोडामार्ग शहर व आजुबाजूच्या गावांमध्ये करावा. परंतु गेल्या दोन महिन्यापासून आजपर्यंत तिलारी-कोनाळ ते सासोली सबस्टेशन या लाईनमध्ये बिघाड असून तो दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. परंतु वीज विभागाकडून कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दोडामार्ग शहर व परिसरातील सर्व गावांमध्ये वीज समस्या कायम आहेत. यासंदर्भात बऱयाचदा निवेदने देण्यात आली. मात्र, दोडामार्गचा वीजपुरवठा सुरळीत राखण्यात निष्काळजीपणा केला जात आहे. येत्या आठ दिवसात तिलारी – कोनाळ ते सासोली सबस्टेशन ही लाईन दुरुस्त करावी. तसेच दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा येथील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी उपस्थित होते.