वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या तर येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर निश्चित सहभागी होणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या अनेक क्रिकेटपटूंना खेळण्याची इच्छा असल्याचे वॉर्नरने म्हटले आहे.
कोरोना महामारी संकटामुळे ऑस्ट्रेलियात होणारी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली तर माझ्यासह अन्य ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएल स्पर्धेत खेळणे सुलभ होईल. आयपीएल स्पर्धेत माझा सहभाग निश्चित असून या स्पर्धेबाबत माझा दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक असल्याचे वॉर्नरने म्हटले आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 16 संघाचा सहभाग असून या स्पर्धेचे ऑस्ट्रेलियाला यजमान भूषविणे थोडे कठीण वाटते. टी-20 विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य अधांतरी राहिले तसेच ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेली तर याच कालावधीत आयपीएल स्पर्धा घेतली जाऊ शकते आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते असेही वॉर्नर म्हणतो.
2018-19 सालात झालेल्या ऑस्ट्रेलियातील भारताबरोबरच्या मालिकेत वॉर्नरला खेळता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील दौऱयात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी ठरल्याने वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य दोन खेळाडूंवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र येत्या उन्हाळी मोसमात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका अत्यंत चुरशी राहील, असेही वॉर्नरने सांगितले.