ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे पुणेकरांनी नियमांचे पालन करावे. जर नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला.
अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा आज घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
- 10 वी, 12 वी च्या परीक्षा नियोजित वेळेनुसार
ते म्हणाले, बोर्डाच्या परीक्षा नियमानुसार होतील. मात्र, परीक्षा घेताना नियमांचे कठोरपणे पालन करणे सक्तीचे असणार आहे. तसेच पालक – पालक यांची मोठी जबाबदारी राहणार आहे. तसेच एमपीएससीच्या परीक्षा नियोजित वेळेत होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, आजच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना विचारले आहे की लसीकरणाची 316 केंद्र दोन्ही शहरांत आहेत, ती दुप्पट करू शकतो का? तसे केले तर लसीकरणाचा कार्यक्रम पुण्यात सर्वात जास्त घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करता येईल. त्यावर प्रकाश जावडेकरांनी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे, असेही पवार यावेळी सांगितले.
- बैठकीतील अन्य निर्णय :
- नागरिकांनी नियमांचे कठोर पालन करावे. यामध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर लावणे गरजेचे आहे.
- ससून रुग्णालयात कोविड खाटांची संख्या 300 वरून 500 करण्यात आली आहे.
- ग्रामीण भागात सुविधा देण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आला आहे.
- खाजगी रुग्णालयात 50% खाटा ताब्यात घेणार.
- सर्व राजकीय नेत्यांनी खाजगी कार्यक्रम रद्द करावेत.
- यासोबतच लग्नकार्याला 50 पेक्षा अधिक उपस्थिती नको.
- अंतिम विधीसाठी केवळ 20 लोकांना परवानगी असेल.
- मॉल्स, चित्रपट गृह 50% उपस्थितीत चालू राहतील.
- संचारबंदी कायम ठेवण्यात आली असून शहरातील उद्याने केवळ सकाळच्या वेळी चालू ठेवली जातील.
- पिंपरीतील जम्बो हॉस्पिटल 1 एप्रिलपासून वापरात येईल.
- ज्यांच्या घरात स्वतंत्र खोली आहे, त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.