स्टेशन रोडवर घडली होती घटना, खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
तलवारीने हल्ला झाल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. 22 रोजी घडली होती. या प्रकरणी त्याच दिवशी एकाला अटक करण्यात आली होती तर त्यानंतर या प्रकरणात सामील असलेल्या आणखी तिघांना खडेबाजार पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून दोन तलवारी, एक कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
प्रफुल्ल बाळकृष्ण पाटील (वय 26, रा. चव्हाट गल्ली, बेळगाव), रोहित कृष्णा रेनके (वय 23, रा. समर्थनगर, दुसरा क्रॉस), सागर उर्फ शैलेश अशोक गवळी (वय 24, रा. पहिला क्रॉस, नानावाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्टेशन रोडवरील क्लबच्या ठिकाणी किरकोळ कारणातून हा हल्ला झाला होता. तलवार घेऊन हा हल्ला झाला होता. यावेळी संशयित आरोपींकडे केए 22 एमए 7263 सियाझ कंपनीची कार आणि केए 22 ईके 8314 ही दुचाकी होती. पोलिसांनी ती वाहने जप्त केली आहेत.
मंगळवार दि. 22 रोजी हे चौघे त्या ठिकाणी गेले होते. तेथे निलेश काकतकर आणि शंकर बजंत्री हे क्लब चालवत होते. या सर्वांमध्ये किरकोळ वादावादी झाली. दारूच्या नशेत महेश प्रकाश मुतगेकर (रा. शिवाजी रोड) आणि प्रफुल्ल, रोहित आणि सागर यांनी अचानक त्या दोघांवर हल्ला केला. यामध्ये निलेश याला गंभीर दुखापत झाली तर शंकर हाही किरकोळ जखमी झाला. यावेळी शंकर याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करुन या सर्वांना अटक केली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हवालदार एस. एम. शिंदे, बसवराज पी. उज्जीनकोप्प, एम. एस. हानगंडी, रमेश गणी यांनी परिश्रम घेतले. या आरोपींना अटक करुन त्यांच्यावर भा.दं.वि. 143, 147, 148, 341, 307, 504, 506 सहकलम 149 आणि ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.