प्रतिनिधी/ बेळगाव
पोहण्यासाठी गावाजवळील तलावात गेलेल्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सायंकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विठ्ठल देवाप्पा बस्तवाडकर (वय 22) असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील जीआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. विठ्ठल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो अभ्यासातही हुषार होता.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. स्थानिक तरुण व काही पाणबुडय़ांनी दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले.
सायंकाळी विठ्ठलचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पोहताना अचानक ठसका लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. रात्री सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.