एम. के. हुबळी येथील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
तोल जाऊन तलावात पडलेल्या नऊ वर्षांच्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा जणांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी एम. के. हुबळी येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
काडाप्पा भीमाप्पा बडीगेर (वय 21) रा. कोण्णूर, ता. गोकाक, कार्तिक प्रकाश बडीगेर (वय 9) रा. एम. के. हुबळी अशी त्या दुर्दैवींची नावे आहेत. रविवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून कित्तूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवराज उळ्ळागड्डी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जवानांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
उपलब्ध माहितीनुसार नऊ वर्षांचा कार्तिक तलावाजवळ शौचाला गेला होता. त्यावेळी तोल जाऊन तो तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी काडाप्पाने तलावात उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.