बेनकनहळ्ळी येथील घटना, हेल्पलाईन टीमची मदत : कॅमेरा पाण्यात सोडून शोधमोहीम यशस्वी
प्रतिनिधी /बेळगाव
बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील ब्रम्हलिंग मंदिराजवळ असलेल्या तलावात बुडून एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी तलावात कॅमेरा सोडण्याचा प्रयोग करण्यात आला. कॅमेऱयाच्या साहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
यल्लाप्पा मारुती देसुरकर (वय 45, रा. बेनकनहळ्ळी) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी यल्लाप्पा ब्रम्हलिंग मंदिराजवळील तलावात बुडल्याची माहिती मिळताच शोध मोहीम राबविण्यात आली. येथील हेल्पलाईन एमर्जन्सी रेस्क्मयु फौंडेशनचे अध्यक्ष बसवराज हिरेमठ, वैभव चव्हाण-पाटील, राजू टक्केकर, पंकज हंडे, आकाश येळ्ळूरकर आदींना पाचारण करण्यात आले.अग्निशमन दल व एसडीआरएफच्या पथकालाही कळविण्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत शोध घेवूनही मृतदेह सापडला नाही. हेल्पलाईन टीमने सोमवारी सकाळी पाण्यात कॅमेरा सोडून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सकाळी 7 पासून हे प्रयत्न सुरू झाले. 9.30 वाजता कॅमेऱयाच्या साहाय्याने मृतदेह आढळला. त्यानंतर तो पाण्याबाहेर काढण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यल्लाप्पा हा पुणे, कोल्हापूर येथे मोलमजुरी करत होता. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपूर्वी तो गावी परतला होता. तोल जाऊन तलावात पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.