विनापरवाना व्यावसायिकांविरोधात मनपाच्या आरोग्य विभागाची मोहीम : 200 हून अधिक व्यावसायिकांना नोटीस
प्रतिनिधी /बेळगाव
विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम महापालिकेकडून तीव्रपणे राबविण्यात येत आहे. मात्र तळघरातील व्यावसायिकांकडे परवाना नसल्याचे निदर्शनास येत आहे. तळघराची कर आकारणी केली जात नसल्याने व्यवसाय परवाना कसा घेणार, असा मुद्दा व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याची मनपालाच डोकेदुखी झाली असून, तळघरातील व्यावसायिकांकडून दुप्पट दंडाची आकारणी करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील व्यावसायिकांकडे व्यवसाय परवान्याची चौकशी करण्यात येत आहे. विनापरवाना व्यावसायिकांना नोटीस बजावून 7 दिवसांत व्यवसाय परवाना घ्या, अशी सूचना केली जात आहे. जर सात दिवसांत परवाना न घेतल्यास दुकान बंद करू, असा इशारा दिला जात आहे. गेल्या चार दिवसांत 200 हून अधिक व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच 50 हजार रुपयापर्यंत दंड वसुली करण्यात आली आहे. मात्र तळघरातील व्यावसायिकांकडे परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेसमोरच याबाबत अडचण निर्माण झाली आहे.
तळघरातील व्यावसायिकांना परवाना दिला जात नाही. तसेच तळघरात व्यवसाय करण्यास बंदी आहे. तळघराचा वापर पार्किंगसाठी करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. तरीदेखील शहरात असंख्य व्यावसायिक तळघरात व्यवसाय करतात. तळघराची कर आकारणी केली जात नाही. त्यामुळे व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करताना घरपट्टी भरलेली पावती हजर करण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी तळघरातील व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. पण महापालिकेने विनापरवाना व्यवसाय केल्याच्या कारणास्तव दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे तळघरातील व्यावसायिकांना अडचण निर्माण झाली आहे. व्यवसाय परवाना घेण्यास तयार आहोत. पण कर भरून घेतला जात नाही. त्यामुळे व्यवसाय परवाना घेण्यास अडचण होत आहे. यावर तोडगा काढा, मगच व्यवसाय परवाना घेऊ, असे व्यावसायिकांनी सांगितले.
त्यामुळे याबाबत महापालिका कार्यालयात चर्चा करून तळघरातील विनापरवाना व्यावसायिकांकडून दुप्पट दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना घेतला नसल्याच्या कारणास्तव दुप्पट दंड भरावा लागणार आहे.