वार्ताहर / हुपरी
तळदंगे ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायत हद्दीतील सि. स.नंबर ३३४ वर बेकायदेशीररित्या चालू असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महिला सरपंच,सरपंच पतीसह कर्मचाऱ्यांच्यावर सशस्त्र हल्ला करून जखमी केल्याची घटना सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.या हल्ल्यात दगड, लाकडी वासा, याचा वापर करण्यात आला होता.
दरम्यान हल्ल्यात सरपंच, सरपंच पतीसह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याने जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गाव बंद करून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.या घटनेसंदर्भात हुपरी पोलीस ठाण्यात सरपंच सौ. जयश्री संजय भोजकर यांनी खानु बिरु शिनगारे, संतोष खानु शिनगारे(दोघेही रा. तळदंगे),सुकुमार नारायण बोरगावे,नवनाथ केरु(दोघेही रा. पट्टणकोडोली) यांचेवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
तळंदगे येथील प्राथमिक मराठी शाळेजवळ असलेल्या सि.स.नंबर 334 या जागेवर ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी खेळाचे मैदान तयार केलेआहे व मैदानाभोवती सिमेंटचे डांब रोवून तारेचे कंपाउंड घातले आहे. दरम्यान ग्रामविकास अधिकारी सुनील हासुरे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता व न सांगता परस्पर सी. ओ. आणि बी. डी. ओ. यांच्या आदेश पत्राच्या आधारे खानु बिरु शिनगारे यांना सि. स. नंबर372अ मधील मिळकत नंबर1590चा रीतसर उतारा 9 जुलै 2020रोजी दिला होता.
या उताऱ्याच्याआधारे खानु शिनगारे यांनी पत्र्याचे शेड मारण्यासाठी कंपाउंड तोडून आत साहित्य ठेवले होते. यावेळी 10जुलै 2020 रोजी सरपंच यांनी डांब पाडून कंपाउंड तोडल्याबद्दल खानु शिनगारे यांच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देखिल देण्यात
दरम्यान, खानू बिरू शिनगारे यांनी शनिवारी रात्री लोखंडी पत्रे व लाकडी बांबू मारून शेड मारण्याचा प्रकार केला होता. सदरचा प्रकार समजताच रविवारीसकाळी पावणे दहा वाजता सरपंच जयश्री भोजकर,सरपंच पती संजय भोजकर, ग्रामपंचायत सदस्य उदय कांबळे, शरद कोळेकर, अजित कांबळे, संजय शिंगे, स्वप्नील शिंदे, महेश कांबळे,पोपट कासार, उत्तम शिंगे, राजू जमादार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले व अतिक्रमण उकडून काढत असता खानू शिनगारे,सुकुमार बोरगावे(पट्टणकोडोली )संतोष खानु शिनगारे ,नवनाथ केरु व इतर दहा ते बारा साथीदारांनी अचानक हातात दगड, काठ्या, लाकडी वासा घेऊन हल्ला चढवला.
यावेळी जोरदारपणे धुमश्चक्री सुरू झाली होती. सरपंच, सरपंच पती ,सदस्य व कर्मचारी यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. सैरावैरा पळत असताना गोंधळ उडाला. अडवण्यासाठी आलेल्या लोकांना देखील आवरता आले नाही. दगड व काठयांचा मार लागल्याने सरपंच,सरपंच पती संजय भोजकर, कर्मचारी संजय शिंगे जखमी झाले आहेत. यासंदर्भात सरपंच सौ. जयश्री संजय भोजकर यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हुपरी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.तपास पी. आय. राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन सावंत करीत आहेत.