प्रतिनिधी / फोंडा
सोमवारपासून सुरु झालेल्या मोन्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला असून फोंडा तालुक्यात काही प्रमाणात पडझड झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यात एकदोन ठिकाणी घरे व वाहनांवर झाडे कोसळली. मंगळवारी सकाळी तळसल-तळावली येथे विष्णू रघुनाथ नाईक यांच्या पार्क केलेल्या प्लेझर स्कूटरवर झाड पडल्याने स्कूटरची पूर्णपणे हानी झाली.
या घटनेवेळी त्या ठिकाणी असलेला त्यांचा मुलगा सुदैवाने बचावला. सुकलेले जुनाट असे हे झाड कोसळताना वीज तारांवर पडल्याने तारा तुटून या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. झाड कोसळताना नेमके रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या जीए 07 डी 7653 या क्रमांकाच्या स्कूटरवर कोसळले व त्यात स्कूटरची पूर्ण हानी झाली. आडपई येथे एका घरावर झाड कोसळल्याने किरकोळ नुकसानी झाल्याचे वृत्त आहे.