चोरट्यांचा धुडगूस सुरूच
कणकवली/प्रतिनिधी-
वैभववाडी तालुक्यात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुडगूस घातल्यानंतर रविवारी रात्री तळेरे बाजारपेठेतील 11 दुकाने चोरट्यांनी फोडली. यात एका दुकानदाराची 4 लाखांच्या जवळपास कॅश चोरीला गेली आहे. तर इतरांची रोख रक्कम कमी आहे. मात्र, चोरीला गेलेल्या मुद्देमालाची आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती.
सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली होती. चोरट्यांनी अनेक दुकानांच्या गल्ल्यावर डल्ला मारल्याचे समजते. चोरट्यांनी रेकी करून ही दुकाने फोडली असण्याची शक्यता आहे. कारण ज्या दुकानांच्या आतील भागात घरे आहेत अशी दुकाने फोडली नसल्याचे दिसत आहे. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर सोमवारी पहाटेपासूनच तरळे येथे दाखल झाले आहेत. वैभववाडी नंतर कणकवली त्यापाठोपाठ आता तरळे मध्ये देखील चोरट्यांनी दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर आता तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच येथील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले. पहाटे तीन ते साडेचार या वेळेत बुरखाधारी चोरटे सीसीटीव्हीत दिसत असल्याचे समजते. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासही सुरू करण्यात आला आहे.