नागरिकांची प्रचंड गैरसोय -पार्किंगच्या जागेत जप्त केलेले डंपर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा हे जिल्हय़ाचे ठिकाण आहे. इतर अनेक शासकीय कार्यालय सुधारली. नवीन जागेत गेली. मात्र, इंग्रजांच्या काळापासून असलेली तहसील कार्यालयाची इमारत अशीच असून आतील पार्किंगची नेहमीप्रमाणे सुरु असलेली बोंबाबोंब तशीच सुरु आहे. उलट आता कर्तव्यदक्ष तहसीलदारांनी जप्त केलेले डंपरनी कार्यालयाचा परिसर व्यापून टाकल्याने नागरिकांना पार्किंगसाठी जागाच उरली नसल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय अशी कार्यालयांची गर्दी असलेल्या सातारा तहसील कार्यालयाच्या परिसरात दररोज हजारो माणसांची गर्दी असते. विविध कामानिमित्त नागरिक दुचाकी, फोर व्हिलर देखील घेवून येतात मात्र, कार्यालयाच्या परिसरात पार्किंग व्यवस्था नसल्याने सातत्याने तहसील कार्यालयाच्या परिसरात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले आहेत.
याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी जावून देखील तसेच याबाबत माध्यमांनी आवाज उठवून देखील प्रांत व तहसीलदांना या समस्येबाबत काहीच वाटत नाही. सेतू कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी असते. या गर्दीतूनच वाहने येजा करत असताना आजबाजुला वाहनांचे पार्किंग, माणसांची गर्दी यातून वाट काढताना नागरिकांचा चांगलाच घाम निघतो.
येथे पार्किंगला शिस्त लावण्याची गरज नसताना सातारा शहर वाहतूक शाखेची क्रेन दर अर्धा तासाने तिथे घारीसारखी चकरा मारते आणि मग तेथील वाहने उचलून नेवून कर्तव्य पार पाडण्याचा आव सुरु असतो. मात्र, अनेक वेळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी दुचाकी घेवून आलेले असतात. त्यांच्याही दुचाकी उचलून नेल्या जातात. त्या विद्यार्थ्यांकडे दंड भरण्यासाठी पैसेही नसतात मग पालकांना पळापळ करायला लागते.
आता कर्तव्यदक्ष तहसीलदारांनी गौण खनिज उत्खन्ननावर धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र, त्यांनी जप्त केलेले आठ ते दहा डंपर तहसील कार्यालय परिसरात जप्तीच्या वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे आता पार्किंगचा पुरता बोजवारा उडून गेला असून मंगळवारी तहसील कार्यालय परिसरात अनेक नागरिकांनी या ढिसाळ नियोजनाबाबत संतापाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नवीन कार्यालय बांधा
सातारा तहसील कार्यालयातील पार्किंग ची अवस्था म्हणजेढिसाळ नियोजनाचा उत्तम नमुना. गाडय़ा लावायला जागाच नाही. वाहतूक विभागाची एक गाडी दर दहा मिनिटाला येथे फिरून गाडय़ा उचलून नेते. त्यात ग्रेड सेपरेटरच्या अजब डिझाईन मुळे गाडी कुठून आत घालायची आणि कुठून बाहेर काढायची, हा यक्ष प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहतोय. आश्चर्य म्हणजे काल जप्त केलेल्या डंपर्समुळे वाहतूक विभागाच्या गाडीला सुद्धा फिरता येईना. त्यामुळे सातारा तहसील कार्यालय हे नवीन ठिकाणी इमारत बांधून स्थलांतरित करावे.