अमेझॉन पदाधिकारी, दिग्दर्शक-निर्मात्यावर गुन्हा, हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप
हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपावरून वादात सापडलेली सैफ अली खन याची मुख्य भूमिका असलेली वेब सीरिज ‘तांडव’वरून अमेझॉन प्राइमच्या अडचणी वाढल्या आहेत. लखनौच्या हजरतगंज पोलीस स्थानकात अमेझॉन प्राइम इंडियाच्या ओरिजिनिल कंटेंट प्रमुख अरुणा पुरोहित, सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशु कृष्ण मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकीच्या विरोधात रविवारी रात्री एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
आरोपींना अटक करू
एफआयआर नोंद झाल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभ त्रिपाठी यांनी आरोपींना इशारा दिला आहे. लोकभावनांचा अनादर सहन केला जाणार नाही. लवकरच ‘तांडव’ वादाशी संबंधित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एफआयआरमध्ये संतापाचा उल्लेख
16 जानेवारी रोजी प्रदर्शित वेबसीरिजच्या कंटेंटवरून समाजमाध्यमांवर लोकांचा संताप व्यक्त होत आहे. वापरकर्ते आक्षेपार्ह कंटेंटची क्लिप प्रसारित आहेत. सीरिजच्या पहिल्या भागात हिंदू देवतांची भूमिका साकारणाऱया पात्रांना अजब पद्धतीने आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दर्शविण्यात आले आहे. याचबरोबर जातीय भांडणांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्ण सीरियजमध्ये पंतप्रधान हे प्रतिष्ठेचे पद बाळगणाऱया व्यक्तीला अत्यंत अपमानास्पद पद्धतीने दर्शविण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये नमूद आहे.
माहिती-प्रसारण मंत्रालय सक्रीय
केंद्रीय मंत्रालयाने अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या पदाधिकाऱयांना पाचारण केले आहे. भाजप खासदार मनोज कोटक यांनी माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना तक्रारीचे पत्र लिहिले होते. तांडवच्या निर्मात्यांनी हिंदू देवतांची थट्टा केली असून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचे कोटक यांनी म्हटले होते.
सैफच्या घराबाहेर बंदोबस्त
तांडववरून होत असलेल्या वादाचा प्रभाव अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही पडत आहे. सीरिजच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सैफच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सैफ सध्या मुंबईत नसला तरीही घरी त्याची पत्नी करिना आणि मुलगा तैमूर आहे.